सचिन कदम, रायगड|ता. १९ ऑगस्ट २०२४
विधानसभेचा रणसंग्राम सुरू होण्याआधीच महायुतीच्या घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. काल अजित पवार यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. अशातच आता रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये कलगितुरा रंगला असून राष्ट्रवादी काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष असल्याची जहरी टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये धुमशान सुरूच आहे. कर्जतच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांच्यावर टोकाची टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यांचं नेतृत्वच तसं विश्वासघातकी आहे असा घणाघात आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. खोपोली इथं आयोजित पक्ष प्रवेश मेळाव्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादी ही घात करणारी पार्टी आहे हे मी जाहीरपणे सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणे हेच त्यांचे काम आहे, जे आपण पाहतोय. त्यांच नेतृत्वच विश्वासघातकी आहे, जिल्ह्याचे जे नेतृत्व लाभले आहे तेच विश्वासघातकी आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर महेंद्र थोरवे यांनी निशाणा साधला.
"जर तुम्हाला आमच्या विरोधात लढायचं असेल तर जाहीरपणे लढा पण महायुतीत राहून गद्दारी खपवून घेतली जाणार नाही," असा इशाराही थोरवे यांनी दिला आहे. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांच्या या विधानामुळे कोकणात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. थोडक्यात विधानसभेआधीच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.