- सागर निकवाडे
Nandurbar News : मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (state excise department mumbai) पथकावर नवपूरात (navapur) शहरात दगडफेक केल्याची घटना नुकतीच घडली आहे. हे पथक कारवाई करण्यासाठी आले असता पथकाच्या कारला अन्य एका कारने धडक देऊन कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती सचिन हिरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार) यांनी दिली. (Maharashtra News)
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील एमआयडीसी परिसरात दमन बनावटीची दारू गुजरातमध्ये तस्करी करण्यासाठी एका ठिकाणी साठवून ठेवल्याची माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली.
या पथकाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता रात्री दीड वाजेच्या सुमारास या पथकावर दहा ते बारा जणांच्या गटाने दगडफेक केली. यामध्ये वैभव गावित याने पथकातील अधिकारी तातू यांच्या कारसमाेर त्यांची गाडी समोर आणत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तातू यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
अवैध दारू तस्करांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने परिसरात तणावपूर्ण आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित वैभव गावित यांच्यासह इतर दहा ते बारा जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नंदुरबार जिल्हा हा गुजरातचा सीमावर्ती भागात असल्याने सीमावर्ती भागातील नवापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात दारूची तस्करी केली जात असते. या दारू तस्करीला आशीर्वाद कुणाचा असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपींच्या शोधासाठी तपास पथके पाठवण्यात आले अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.