काटोल येथील SBL एनर्जी कंपनीत भीषण स्फोट
स्फोटामध्ये १७ कामगारांचा मृत्यू
१८ कामगार गंभीर जखमी झाले
गेल्या ३ वर्षांत नागपूरमध्ये कंपनीत स्फोट होऊन ४० हून अधिक निष्पापांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगाव येथे एसीबीई एनर्जी कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामध्ये १७ निष्पाप कामगारांचा जीव गेला. या स्फोटात १८ जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ या स्फोटक कंपनीतील या दुर्घटनेने पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. वारंवार होणारे स्फोट, कंपन्यांचे दुर्लक्ष आणि प्रशासनाची सुस्ती यामुळेच का हे मृत्यूचं सत्र थांबत नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ कंपनीत सुमारास भीषण स्फोट झाला. ‘नोनल क्रिम्पिंग’ युनिटमध्ये डेटोनेटर्स सेलचं पॅकिंग सुरू असताना अचानक स्फोट झाला आणि क्षणार्धात आगीचे लोळ उसळले. अक्षरशः कंपनीत राख रंगोळी झाली. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या युनिटमध्ये ३० ते ३५ पेक्षा जास्त कामगार काम करत होते. त्यापैकी १७ महिला कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर १८ जण गंभीर जखमी झाले. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या गावांमध्येही हादरे जाणवले. जिथे स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली.
या कंपनीत मोठ्या प्रमाणावर महिला कामगार काम करत होत्या. मात्र घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना नव्हत्या, अशी गंभीर तक्रार आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा तत्काळ उपलब्ध नव्हती, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. यात देशातलं महत्त्वाचं कार्यालय म्हणून पेट्रोलियम अँड एक्स्प्लॉजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन नागपुरात असताना अशा पद्धतीचे स्फोट वारंवार घडत आहे त्यामुळे या कंपन्यांचे ऑडिट व्हावे अशी मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वीच केली होती. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या स्फोटावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारने याची चौकशी करावी अशी मागणी केली.
नागपूरमधील कोणत्या दिवशी कोणत्या कंपनीत स्फोट होऊन किती जणांचा मृत्यू?
- ४ सप्टेंबर २०२३ – सोलार एक्स्प्लोझिव्ह - २ जणांचा मृत्यू
- १२ डिसेंबर २०२३ – सोलार कंपनी - ९ जणां मृत्यू
- १३ जून २०२४ – चामुंडा बारूद - ८ जणांचा मृत्यू
- १६ फेब्रुवारी २०२५ – एशियन फायरवर्क - २ जणांचा मृत्यू
- ४ सप्टेंबर २०२५ – सोलार एक्स्प्लोझिव्ह - २ जणांचा मृत्यू
- ३ मार्च २०२६ – SBL कंपनी - १७ जणांचा मृत्यू
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कंपनी मालकाशी फोनवर चर्चा करत त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं. उडवाउडवीची उत्तरं चालणार नाहीत असे त्यांनी सांगितले. प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुनीता गावंडे उपस्थित होत्या. तसेच देशमुख यांनी शहरातील विविध रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. ‘पेसो’ आणि औद्योगिक सुरक्षा विभागाकडून चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे गोळा करत आहे. काही मृतांची ओळख डीएनए चाचणीनंतरच पटणार आहे. मात्र प्रश्न तोच आहे की वारंवार होणाऱ्या या दुर्घटना थांबवण्यासाठी कठोर नियमावली आणि कडक अंमलबजावणी कधी होणार? केव्हापर्यंत कामगारांचे जीव जात राहणार? की या भीषण स्फोटानंतर शासन खरोखरच कठोर पावलं उचलेल? हे सरकारी प्रणालीच्या अपयशाचं जळतं उदाहरण आहे. यावर ठोस उपाय योजना करण्यात यश आलं तरच जळणारी मृतदेहांची ही होळी थांबवता येईल. नाहीतर सातत्याने अशा घटना घडत राहील आणि मृतदेह जळत राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.