भ्रष्टाचारांचे आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीमुळं अडचणीत आलेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. कौटुंबिक न्यायालयानं करूणा शर्मा यांना महिन्याला २ लाख रूपये पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत. त्यामुळं आता धनंजय मुंडेंवरची आरोपांची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता वाढली आहे. तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया यांनी या प्रकरणानंतर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा भरला आहे, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात कौटुंबिक न्या. कोर्टाचा निकाल येताच तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'करूणा शर्मा यांना न्याय मिळाला आहे. त्या नेहमीच सांगायच्या की मी धनंजय मुंडेंची पत्नी आहे. त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार झाला आहे. कोणतीही दखल घेतली नसल्यानं त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं त्यांना न्याय दिला. महिन्याला पोटगी किंवा त्यांच्या मुलीचा जो काही खर्च असेल ते देण्याचं मान्य केलं. मुंडेंनी आता तरी आरोप मान्य करावे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
राजीनामा द्यावा
धनंजय मुंडेंनी पदाचा गैरवापर करत अनेक कृत्य केले आहेत. मला आता वाटतंय त्यांच्या पापाचा घडा भरत आला आहे. खंडणी प्रकरणातही मुंडेंचीच माणसं आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर येत आहे, कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी दिलेला नाही. सर्व पुरावे आले आहेत, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.
करूणा या कौटुंबिक न्यायालयात जिंकल्या
यासंदर्भात अंजली दमानिया यांनी ट्वीट केलं आहे. 'करूणा या कौटुंबिक न्यायालयात जिंकल्या. त्याबद्दल एक महिला म्हणून त्यांचे अभिनंदन. ही वैयक्तिक टीका नाही. याची नोंद घ्यावी. करूणा यांना १,२५, ००० रूपयांचा मासिक खर्च देण्यात यावा, असे निर्देश कोर्टानं दिले आहे.
एका महिलेच्या आत्मसन्मानाचा लढा
करुणा मुंडेंबद्दल कोर्टाने दिलेलं निर्णय हे अभिनंदनीय आहे. एका महिलेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे त्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद आहे. फडणवीस यांना सगळं माहिती असताना तरी देखील कानावर हात ठेवून का आहेत? हा कळीचा मुद्दा आहे, असं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.
तो व्यक्ती मंत्री पदावर राहणं योग्य नाही
त्या निर्णयाचं स्वागत करतो. प्रतिष्ठित व्यक्तीने आणि संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीनं अस वागणं योग्य नाही. त्या महिलेची भूमिका न्यायालयाने मान्य केली. याचा अर्थ विद्यमान मंत्र्यांनी कौटुंबिक हिंसा केली. जर दोन लाख पोटगी द्या म्हणते म्हणजे कौटुंबिक हिंसा झाला असं कोर्टानं मान्य केलंय. तो व्यक्ती मंत्री पदावर राहणं योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
धनंजय मुंडे यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. ही कोर्टाची फक्त अंतरिम ऑर्डर आहे, हे लक्षात घेणे महत्त्वपूर्ण आहे. अर्जदारांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी कोर्टाकडून आदेश देण्यात आले आहेत. धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा आणि त्यांच्या मुलांसोबतचे संबंध आधीच कबूल केलेले आहेत, त्या आधारावरच कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.