भरत मोहोळकर, साम टीव्ही
मुंबई : राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना श्रेयवादाच्या कचाट्यात सापडलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहिरात करताना लाडकी बहीण योजनेच्या नावातून मुख्यमंत्री शब्द वगळला. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शंभुराज देसाई, दादा भुसेंसह शिंदे गटाच्या मंत्र्यांनी हंगामा केला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मात्र मध्यस्थी करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढं महाभारत झाल्यानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नाव वगळण्याचं समर्थन केलं.
लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री शब्द वगळल्याने नाराजी मंत्री शंभुराज देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर अजित पवार गटातून प्रतिक्रिया आली. अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी अनाथांचा नाथावर आम्ही आक्षेप घेतला नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
तर हे कमी होतं की काय भाजपनेही थेट बारामतीत लाडकी बहीण योजनेचा बॅनर लावला. मात्र त्यावर अजित पवारांचा फोटो वगळला. त्यामुळे लाडकीवरून महायुतीत वाद सुरू असल्याचं चव्हाट्यावर आलं. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जाहिरातीची SOP तयार करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी बॅनरबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कान टोचलेत.
या वादात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, असे ते म्हणाले .
लोकसभेला फटका बसल्यानंतर विधानसभेपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. ही योजना विधानसभेला गेमचेंजर ठरण्याची चर्चा असतानाच आता श्रेयावरून लढाई रंगलीय. त्यामुळे निवडणुकीपूर्वी वाद दूर करण्याचं आव्हान महायुतीसमोर आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.