राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले आहे. पुणे, रायगड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये १३ मे पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता. तसंच अनेक ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात सलग चौथ्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. उपनगरातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात पाऊसाची जोरदार बँटींग सुरू आहे. कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान आवकाळी पाऊसाचा मोठा फटका चाकण बाजार समितीत ठेवण्यात आलेल्या कांद्याला बसला आहे. चाकण बाजारसमितीत कांदा भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सांगलीच्या मिरजमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली. झाडं पडल्यामुळे वाहनांचे नुकसान झाले आहे. मिरजमध्ये झाड पडल्यामुळे तीन रिक्षांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेत पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
रायगडमधील अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावासाने हजेरी लावली. महाड आणि पोलादपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिण रायगडच्या काही भागात संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. काही वेळ पडलेल्या या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या रायगडकरांना काहीसा दिलासा मिळाला.
आज पुन्हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे गंगापूर तालुक्यातील पाडळसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण यामध्ये शाळेचे मोठे नुकसान झाले आहे. याच शाळेत लोकसभेचे मतदान केंद्र आहे. लोकसभा निवडणूक दोन दिवसांवर आली असताना लोकसभेचे मतदानकेंद्र असलेल्या या शाळेचे पत्रे उडाले असून तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. श्रीगोंदा येथे मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे प्रचार सभा बंद करण्यात आली. या पावसामुळे संपूर्ण सभा मंडपाचे नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. पण उकाड्यामुळे हैराण झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
गोंदिया जिल्ह्यात ७ ते १० मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. त्यामुळे बळीराजा संकटात आला आहे. गोंदिया विधानसभा क्षेत्रात देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्याचा दौरा करून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी कृषी आणि महसूल विभागांचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.