विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट तीव्र
तापमान ४५°C च्या पुढे; नागरिक त्रस्त
कोकण आणि काही भागात वादळी पावसाचा इशारा
हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी
मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येण्याची शक्यता
अरबी समुद्र आणि अंदमान परिसरात मान्सूनची आगेकूच सुरू झाली असताना, महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अनेक भागांत उन्हाचा कडाका तीव्र जाणवत आहे. तसेच पूर्वमोसमी वादळी पावसाला देखील पोषक हवामान आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने आज मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विशेषतः अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांत तापमानाचा पारा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
गेल्या २४ तासांत विदर्भात उष्णतेचा कहर पाहायला मिळाला. अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. यवतमाळ, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथेही तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. राज्यातील इतर भागांतही उष्णतेचा प्रभाव कायम असून, अनेक ठिकाणी ४२ अंशांच्या आसपास तापमान राहिले. याउलट महाबळेश्वर येथे २०.९ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदले गेले.
IMDच्या अंदाजानुसार, मान्सून २६ ते ३१ मेदरम्यान केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एका आठवड्यात तो महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच सुमारे ६ जूनच्या आसपास, मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या राज्यात उकाडा आणि उष्णतेची लाट असली, तरी हवामानातील घडामोडी लक्षात घेता मान्सून वेळेवर किंवा किंचित लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.