Maharashtra Weather Update : देशात हवामानात पुन्हा एकदा वेगाने बदलताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिल्ली, उत्तर प्रदेशासह देशातील १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार गारपिटीचा (Hailstorm) इशारा दिला आहे. आगामी काही दिवसांत अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
१४ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबसह १५ राज्यांमध्ये खराब हवामानाची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सकाळ आणि संध्याकाळच्या तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. ईशान्य मोसमी पाऊस दक्षिण भारताकडे सरकत आहे. १४ ते १९ ऑक्टोबर दरम्यान दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
१४ ऑक्टोबर रोजी हरियाणा, पंजाब, दिल्ली, चंदीगड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये सोसाट्याचा वारा, वादळे आणि गारपिटीचीही शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या उंच भागांमध्ये हिमवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस पाऊस सुरू राहील.
पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही वेळा वाऱ्याचा वेग ताशी ६० किमीपर्यंत पोहोचू शकतो. वीज पडण्याचाही धोका आहे. मान्सूननंतर दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी सौम्य गारवा जाणवत आहे. येत्या काही दिवसांत थंडी हळूहळू वाढेल, पण दिवसाची उष्णता कायम राहू शकते.
महाराष्ट्रात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; कोकणात उष्ण व दमट हवामानाचा ‘येलो अलर्ट’
राज्यातून मॉन्सूनने माघार घेतल्यानंतर निरभ्र आकासामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला असून नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’च्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागात सूर्यकिरणांची तीव्रता वाढल्याने उष्ण आणि अतिशय दमट हवामानाची स्थिती निर्माण झाली असून, हवामान विभागाने या भागात सतर्कतेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३८ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. कडक ऊन आणि हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे दुपारच्या वेळी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असून घामाच्या धारा वाहताना दिसत आहेत. अशा हवामानात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आणि सावलीत राहण्याचे आवाहन हवामानतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.