वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ११ वा स्मृतिदिन. मराठेशाहीचा बाणा जपत देशभर हिंदुत्वाची पताका फडकवणारे, शिवसेनेची बुलंद तोफ म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरातील शिवसैनिक शिवाजी पार्कवरील त्यांच्या स्मृतीस्थळावर येऊन आदरांजली वाहण्यासाठी दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली असून शिंदे गटावरही निशाणा साधला आहे.
सामना अग्रलेख जशाच्या तसा....
महाराष्ट्राचे राजकारण हे 'भयंकर' या शब्दाला साजेसे झाले आहे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा घोर काळात आपल्यात नाहीत. देशात लोकशाही, संसद, न्यायालये, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळला जात आहे आणि अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारणारे बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत.
महाराष्ट्रात 'जात विरुद्ध जात' असा आरक्षणाचा भडका उडाला आहे. त्या भडक्यात मराठी माणसांचे ऐक्य होरपळताना दिसत आहे. अशा वेळी जातीभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, असे सांगणारे बाळासाहेब आपल्यात नाहीत. मुंबईचे लचके तोडले जात आहेत.
महाराष्ट्राच्या राजधानीचे महत्त्व कमी केले जात आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरात लॉबी पळवत आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानास चूड लावणारे दळभद्री राजकारण सुरू असताना “मुंबईस हात लावाल तर मी त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," अशी गर्जना करून महाराष्ट्रद्वेष्ट्यांना 'दे माय धरणी ठाय' करून सोडणारे बाळासाहेब आज नाहीत.
मुंबई 'अदानी'स विकली जात असताना त्या सौद्यात भाजपसह सगळे सामील होत आहेत. त्यांचा सौदा उधळण्यासाठी मुंबई रक्षक बाळासाहेब आपल्यात नाहीत. बाळासाहेब आज नाहीत ही वेदना आहे, पण त्यांनी दिलेला लढण्याचा विचार म्हणजेच धगधगती प्रेरणा आहे. बाळासाहेब फक्त शरीराने आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांनी निर्माण केलेल्या भव्य - विशाल शिवसेनेच्या रूपाने ते महाराष्ट्राच्या कणात आणि मनामनात आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एका कालखंडावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, नेतृत्वाचा, कुंचल्याच्या फटकाऱ्यांचा ठसा उमटविला अशा इतिहास घडविणाऱया धुरंधर पुरुषांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गणना केली जाते. शिवसेनेसारख्या बलाढ्य संघटनेचा संस्थापक म्हणून इतिहासात बाळासाहेब अमर झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणास 11 वर्षे झाली.
तरीही ते आपल्यात आहेत व आपल्यात हवेत असे वाटणे हेच त्यांचे मोठेपण. जगभरातल्या एकजात सगळ्या डरपोक व गद्दार लोकांना नरेंद्र मोदी यांनी भाजपात घेतले, असे एक परखड विधान प्रियांका गांधी यांनी काल केले. आज बाळासाहेब असते तर सर्व राजकीय मतभेद विसरून ते म्हणाले असते, “शाब्बास पोरी!” बाळासाहेब परखड आणि स्पष्टवक्ते होते.
देशातील आजचे वातावरण निराश करणारे आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस देशात अराजक माजेल, असा इशारा बाळासाहेब ठाकरे देऊन गेले. तो इशारा खरा ठरताना दिसत आहे. देशात अराजकाचा स्फोट होईल, पण लोकांना आधार देणारे बाळासाहेब नाहीत. एकेकाळी बाळासाहेब तळमळीने म्हणाले होते, “ज्यांना देशाचे संविधान व कायदे मान्य नसतील त्यांनी सरळ कराची-लाहोर गाठावे!” बाळासाहेबांचा हा इशारा तेव्हाच्या धर्मांध मुसलमानांसाठी होता.
आज आपलेच लोक संविधान व देशाचे कायदे मानायला तयार नाहीत. या घटनाद्रोह्यांना सुतासारखे सरळ करायला बाळासाहेब, तुम्ही आज हवे होता! बाळासाहेब, तुम्ही आज नाहीत, पण तुम्हीच घडवलेली गरम रक्ताची पिढी शिवसेना व महाराष्ट्राची कवचकुंडले बनून लढते आहे, ती लढत राहील. हीच तुम्हाला मानवंदना ! (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.