नाशिकमधील राजकारणात मोठी उलथापालथ
नाशिकमध्ये मनसे आणि मविआची स्थानिक पातळीवर युती
दिनकर पाटील यांनी मनसेच्या वतीने केली घोषणा
काँग्रेसचे स्थानिक नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एकापाठोपाठ अनेक बैठका देखील झाल्या. त्यामुळे मनसे मविआ एकत्र येणार की ठाकरे बंधू एकत्र लढणार याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. अखेर नाशिकमध्ये मनसे-मविआची युती झाल्याचे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. पण राज्यात मनसे- मविआ एकत्र लढणार की नाही याबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून महाविकास आघाडीमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मनसेची एन्ट्री झाली आहे. मनसे नेते दिनकर पाटील यांनी ही मोठी घोषणा केली असून या निर्णयामुळे नाशिकमध्ये नवी राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. दिनकर पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'आता इथून पुढे ज्या ज्या निवडणुका असतील. तेव्हा हे गटबंधन झालंच आहे आता'. नाशिकमध्ये आगामी नगरपरिषद आणि इतर सर्व निवडणुकांमध्ये ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आता मनसेही एकत्र निवडणूक लढवणार आहे. राज्यातील वरिष्ठ नेते राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेतील, असेही पाटील यांनी सांगितले. मात्र, स्थानिक पातळीवरच्या या आघाडीमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये मनसेसोबत जाण्याचा स्थानिक काँग्रेस नेत्यांचा निर्णय बाळासाहेब थोरात यांच्या कोर्टात गेला आहे. दुपारी ४ वाजता काँग्रेसचे स्थानिक नेते यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत. प्रदेश पातळीवरील काँग्रेस नेत्यांना देखील आजच्या निर्णयाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, एकत्र निवडणूक लढणार असा निर्णय जवळपास झालेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या त्या त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे.'
विजय वडेट्टीवार यांनी हे देखील स्पष्ट केले की, 'नाशिकमधील काँग्रेसच्या नेत्यांनी मनसेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो नाशिक पुरता असे आम्ही मानतो. स्थानिक लेव्हलवर सगळे राजकीय परिस्थिती बघून घेतलेला तो निर्णय आहे त्यामुळे फार वाद निर्माण होईल अशी परिस्थिती नाही. मनसेसोबत जाण्याचा किंवा न जाण्याचा ही चर्चा वारंवार केली जाते. नेत्यांनी मिळून भूमिका स्पष्ट केली आहे. आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाना ज्यांना या निवडणुकीत आघाडी करायचा आहे त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आहे. आमचा विरोध करण्याचा अधिकार नाही. त्यांना अधिकार दिल्यावर संबंध नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.