लोकसभा निकालानंतर शरद पवारांकडून अजित पवारांच्या एकेक नेत्याला गळाला लावण्याचं काम सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर माढ्यातील शिंदे पिता-पूत्रांनी शरद पवारांची भेट घेतल्याने साहेब दादांना धक्का देणार का? याविषयी चर्चा रंगलीय. त्यावरचा हा खास रिपोर्ट..
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ यायला सुरुवात झालीय. तसतसे पवारांनी राजकीय डाव टाकायला सुरुवात केलीय. त्यातच माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिंह शिंदेंनी थेट मोदीबाग गाठत शरद पवारांची भेट घेतलीय. त्यामुळे बबन शिंदेंच्या घरवापसीच्या चर्चेला उधाण आलंय. राष्ट्रवादीतील फूटीनंतर पवारांनी धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली. ती धक्क्यांची मालिका अजूनही थांबायला तयार नाही.
साहेबांचा दादांना धक्का?
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणेंची घरवापसी करत खासदार केलं
निलेश लंकेंचा पक्षप्रवेश करून घेत अहमदनगर दक्षिणची उमेदवारी देत निवडून आणलं
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणेंची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी
पिंपरी-चिंचवडचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोरांनीही दादांना सोडचिठ्ठी दिली
माजी आमदार बाबाजानी दुर्राणींनीही शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला
अजित पवारांचे निकटवर्तीय प्रवीण शिंदेंही शरद पवारांच्या पक्षात परतले आहेत.
लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा आहे. त्यातच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील काँग्रेसच्या स्टेजवर गेले तर माढ्याचे आमदार बबन शिंदेंही मुलासाठी पवारांच्या दाराची पायरी चढले. छगन भुजबळांनी मात्र शिंदेंच्या घरवापसीची शक्यता फेटाळून लावलीय. ऐन विधानसभा निवडणुकांआधी अजितदादांच्या नेत्यांकडून शरद पवारांच्या भेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे दादांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या सुमार कामगिरीचं खापरही अजितदादांवर फोडलं जातंय. त्यापार्श्वभूमीवर दादा पक्षाला लागलेली गळती कशी रोखणार? आणि शरद पवारांच्या आक्रमक रणनीतीला सामोरं कसं जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.