Maharashtra Politics Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : "ठाकरे बंधू एकत्र यावेत ही लोकांची इच्छा" माजी आमदार वैभव नाईकांनी दिले ठाकरे बंधूंच्या एकीचे संकेत

Vaibhav Naik : माजी आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे बंधूंच्या एकीबाबत मोठे विधान करत महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होईल असे सांगितले. तसेच मुंबई पालिकेच्या येत्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंना जनतेचा पाठिंबा निश्चित मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Alisha Khedekar

  • ठाकरे बंधूंच्या एकीवर वैभव नाईकांचा ठाम विश्वास, महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होईल.

  • भाजपच्या सत्तापद्धतीवर टीका; लोकांचा कल भाजपविरोधात असल्याचा दावा.

  • मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले, तर भाजपला पराभवाचा सामना करावा लागेल.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल टॉवर बंद; आंदोलनाची नाईकांची चेतावणी.

मराठी भाषेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या एकीची महाराष्ट्रात चर्चा कायम असतानाच माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडेल, असे स्पष्टपणे सांगितले आहे. ठाकरे बंधू एकत्र यावेत ही जनतेची इच्छा असून, त्यादृष्टीने कार्यकर्त्यांमध्येही हालचाली सुरू झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी नुकतेच केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करत नाईक म्हणाले की, मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका निवडणुकीसाठी या दोन नेत्यांनी एकत्र यावे, अशी प्रक्रिया हळूहळू दिसू लागली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वेळोवेळी दिलेली सूचक विधाने हाच या चर्चेचा आधार असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातही या दोन्ही नेत्यांनी हातमिळवणी करावी, अशी मागणी होत असून, यामुळे मराठी माणूस हळूहळू एकवटू लागल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

नाईक म्हणाले की, महायुती सरकार आल्यानंतर भाजपच्या कार्यपद्धतीमुळे राज्यभरात आणि विशेषतः मुंबईत परप्रांतीयांची मुजोरी वाढली आहे. हीच वेळ मराठी माणूस एकत्र येऊन ठोस भूमिका घेण्याची आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल, याची आम्हाला खात्री आहे, असे नाईक यांनी ठामपणे सांगितले.

भाजपच्या सत्तेबाबत टीका करताना वैभव नाईक म्हणाले , "यावेळी भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेत न जाण्यापासून थोडक्यात वाचली आहे. ज्यांच्या विरोधात त्यांनी रस्त्यावर आंदोलने केली त्याच नेत्यांना म्हणजेच नवाब मलिक आणि हसन मुश्रीफ यांना सोबत घ्यावे लागले. वेगवेगळी आश्वासने देऊन भाजपने सत्ता मिळवली, मात्र लोकांचा कल भाजपकडे नाही हे या निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीतच नव्हे तर इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपविरोधातील कल ठळकपणे दिसून येईल." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सातत्याने केले जाणारे वक्तव्य त्यांनी निशाण्यावर घेतले. नाईक म्हणाले , "जर तुम्हाला ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची भीती वाटत नसेल, तर वारंवार का वक्तव्य करता? अजूनही का राज ठाकरेंना भेटता? आमच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न का करता? यावरून हे स्पष्ट होते की भाजपलाही ही निवडणूक सर्व विरोधकांना एकत्र करून लढवावी लागेल, अशी भीती वाटते. विधानसभा निवडणुकीत लोकमत चुकीच्या मुद्द्यांवर मिळवले असले तरी, येणाऱ्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंना जनतेचा पाठिंबा निश्चित मिळणार आहे." असा दावाही त्यांनी केला.

याशिवाय जिल्ह्यातील बीएसएनएल सेवांच्या दयनीय अवस्थेबाबतही वैभव नाईक यांनी संताप व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के दूरसंचार व्यवस्था ही बीएसएनएल टॉवरवर अवलंबून आहे. परंतु सध्या जवळपास ३५० टॉवर बंद अवस्थेत असून, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत सावंतवाडी येथे आंदोलन उभारले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. खासदार नारायण राणे यांनी कधीही या समस्येकडे लक्ष दिले नाही, तर माजी खासदार विनायक राऊत यांनी मंजूर केलेल्या टॉवरचे श्रेय मात्र घेतले, अशी टीकाही त्यांनी केली.

माजी आमदार वैभव नाईक यांच्या या विधानांमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला पुन्हा जोर चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर भाजपविरोधातील वाढत्या असंतोषामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT