Summary -
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साताऱ्यात मोठा धक्का
मानलेली बहीण विमल ओंबळे यांनी सोडली पक्षाची साथ
शिंदे गटातील अंतर्गत मतभेद आणि पाठिंबा मागे घेतल्यामुळे विमल ओंबळे नाराज
ओंबळे यांनी मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये साताऱ्यात मोठी राजकीय घडामोड घडली. साताऱ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला. साताऱ्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांची मानलेली बहीण आणि माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यामुळे साताऱ्यात या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची ताकद चांगलीच वाढली असल्याची चर्चा सुरू आहे.
साताऱ्यात घडलं असं की, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विमल ओंबळे यांची जबाबदारी स्थानिक नेते कुमार शिंदे यांच्याकडे सोपवली होती. पण दोन दिवसांपूर्वीच कुमार शिंदे यांनी अचानक त्यांचा पाठिंबा काढून घेतला. कुमार शिंदे यांनी विमल ओंबळे यांच्या प्रतिस्पर्धी विमल बिरामणे यांना पाठिंबा दिला. याची माहिती विमल ओंबळे यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितली. पण त्यांच्याकडून काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या विमल ओंबळे यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडली. त्यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
साताऱ्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली. तिकीट न मिळाल्याने नासिर मुलाणी यांनी बंड पुकारले. मंत्री मकरंद पाटील यांनी मुलाणी यांची समजूत काढली त्यामुळे मुलाणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद थांबला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीमध्ये ७ उमेदवार होते. यामधील दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला.
राष्ट्रवादीचे नासिर मुलाणी आणि शिवसेना ठाकरे गटाचे राजेश कुंभारदरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ५ उमेदवार आहेत. याठिकणी प्रत्यक्ष तिरंगी लढत होणार आहे. तर नगरसेवकाच्या २० जागांसाठी ८३ उमेदवारांनी ११४ अर्ज दाखल केले होते. त्यामधील २० अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता नगरसेवक पदासाठी ६३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता याठिकाणी कोण विजयी होतंय हे पाहणं महत्वाचे राहिल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.