विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी
आता राज्यातल्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी.....अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. स्वत: अजित पवारांनीच त्याबाबत विधान केलंय. त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा जय पवार हे बारामतीतून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी जय पवारांचं नाव पुढं करण्यामागे काय कारण आहे? अजित पवारांना पराभवाची भीती आहे का? की ते दुस-या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत? यावरचा हा विशेष रिपोर्ट...
लोकसभेसारखाच विधानसभेतही बारामतीत काका-पुतण्यांमध्ये सामना रंगण्याची चर्चा रंगत असताना यात आता अचानक मोठा ट्विस्ट आलाय. त्याला कारण आहे. अजित पवारांचा मुलगा जय पवार....बारामतीच्या जनतेनं जय पवारांच्या नावाचा आग्रह धरला तर बारामतीतून जय पवार यांना संधी दिली जाईल असं मोठं विधान अजित पवारांनी केलंय. एवढंच नव्हे तर आपण 7-8 निवडणुका लढलो आहोत. त्यामुळे आपल्याला तेवढा रस नसल्याचंही पुढे दादांनी नमूद केलंय. त्यामुळे अजित पवार बारामती सोडणार असल्याच्या चर्चेला ऊत आलाय. नेमकं काय म्हटले आहेत अजित पवार पाहूयात....
अजित पवारांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा सुनील तटकरेंनी केलाय. तर लोकसभा निवडणुकीच्या अनुभवातून काही गणितं बदलली असतील तर माहीत नाही असं सूचक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलंय. मुलासाठी बारामती सोडली तरी अजित पवार दुस-या कोणत्यातरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार यात शंका नाही. रोहित पवारांनीही अजित पवार कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केलाय.
अजित पवार बारामती सोडणार असल्याची चर्चा रंगली असली तरी ते निवडणूक लढवणार नाहीत असं होऊ शकत नाही. कारण दादांचं लक्ष्य केवळ निवडणुका जिंकणं नव्हे तर थेट मुख्यमंत्री होण्याचं आहे हे लपून राहिलेलं नाही. त्यामुळे बारामतीत जय पवार आणि युगेंद्र पवार या बंधुंमध्ये सामना रंगणार की कर्जत जामखेडमध्ये पवार काका-पुतण्यात सामना रंगणार याकडे राज्याचं लक्ष आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.