राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले असून येत्या तीन ते चार दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामानप्रमुख एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या वाऱ्यांसोबत आद्रतेच्या प्रमाण वाढले असून राजतातील अनेक भागांमध्ये पावसाची नोंद होत आहे. सध्या मान्सून राज्यातील बहुतांश भागात पोहोचला असून येणाऱ्या काळात पावसाची परिस्थिती अनुकूल राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः कोकण किनारपट्टीवर ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असून पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई या भागांना काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुण्याच्या घाटमाथा भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून घाटमाथ्यावरही चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उद्या रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहून बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असतानाच उल्हासनगर, अंबरनाथ मध्ये पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही तासांपासून शहरात रिमझिम पाऊस सुरू असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शहरातील तापमानात काहीसा फरक जाणवत आहे. पावसाच्या आगमनाने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पावसाळ्याची चाहूल लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळाला असून उकड्यांपासून नागरिकांना दिलासा मिळालाय.तर पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.
वसई-विरार शहरात मान्सूनने जोरदार हजेरी लावत पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. आज दुपारपासूनच शहराच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली असून आकाशात दाट ढगांचे साम्राज्य पसरले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अखेर पावसाने हजेरी लावली असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या कल्याण डोंबिवलीकरांना आज अखेर पावसाने दिलासा दिला. सकाळपासून शहरात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढत जोरदार सरींनी संपूर्ण शहराला झोडपून काढले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दुपारच्या सुमारास ढग दाटून आले आणि त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यात अनेक भागात आज मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे संत्रा बागाना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी मृग बहारासाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. पावसाअभावी संत्रा बागांमधील व्यवस्थापनाचा खर्च वाढत असून, यंदा वेळेत आणि चांगला पाऊस होऊन मृग बहार घेता यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. तर सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आज पडलेल्या पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.