

कोल्हापूर–वैभववाडी रेल्वेमार्गाचा निर्णय अंतिम
कोल्हापूर–सिंधुदुर्ग प्रवास फक्त एका तासात शक्य
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना
अनेक वर्षांपासून कोकणवासीय जे स्वप्न पाहत होते ते पूर्ण होणार आहे. कोल्हापूर-वैभववाडी हा कोकण रेल्वे मार्गाला जोडणारा मार्ग होणार आहे. सरकारने या मार्गासाठी निर्णय घेतला असून त्याबाबत भूसंपादन करण्यास सुरुवात केलीय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायण राणे यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा या मार्गाला चालना मिळालीय. रोजगारासह आर्थिक चालना देणारा ठरेल.
सध्या कोल्हापूर-सिंधुदुर्ग रस्ते प्रवासासाठी दीड ते २ तास लागतात. रेल्वेमार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास एका तासात, तर कणकवली-कोल्हापूर सव्वा तासात पूर्ण होईल. त्यामुळे सिंधुदुर्गातील तरुणांना रोज कोल्हापूरला नोकरीसाठी ये-जा करणे शक्य होणार आहे.
हा रेल्वेमार्ग राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. सिंधुदुर्ग जिल्हा आणि संपूर्ण कोकणच्या विकासासाठी हा रेल्वेमार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारी फळे, मत्स्य उत्पादने, गौण खनिजे आदी मालाला पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठा सहज उपलब्ध होतील.
कोकणातील हापूस आंबा प्रामुख्याने मुंबई बाजारपेठेतच पाठवला जात होता. मात्र आता होणाऱ्या या रेल्वेमार्गामुळे कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूरसह थेट नागपूरपर्यंतच्या बाजारपेठेत हापूस आंबा दिसेन. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
विजयदुर्ग येथे प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय बंदर या रेल्वेमार्गामुळे थेट जोडले जाईल. त्यामुळे बंदराला रेल्वेची कनेक्टिव्हिटी होणार असल्याने आयात-निर्यातीच्या दृष्टीने मोठा फायदा होईल. सिंधुदुर्गातील चिरे, खनिजे तसेच अन्य साहित्य पश्चिम महाराष्ट्रात पाठवणे सुलभ होईल. तर पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाची मळी, दुग्धजन्य पदार्थ व औद्योगिक माल निर्यातीसाठी विजयदुर्ग बंदरात आणता येईल.
सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र दरम्यानची वाहतूक प्रामुख्याने घाटमार्गांवर अवलंबून आहे. मात्र वाढत्या वाहतुकीमुळे हे घाटमार्ग कमकुवत व अपघातप्रवण झालेत. रेल्वेमार्ग उपलब्ध झाला तर प्रवासी व मालवाहतूक मोठ्या प्रमाणात रेल्वेतून होईल. यामुळे घाटमार्गांवरील ताण कमी होईल. तसेच वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि कमी खर्चात होईल.
या रेल्वेमार्गामुळे सिंधुदुर्ग व कोकण पश्चिम महाराष्ट्राशी अधिक जवळ येतील. मुंबई परिसर सध्या सॅच्युरेशन पॉइंटवर पोहोचलाय. तेथे रोजगार व निवासाचे प्रश्न गंभीर झालेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमधील रोजगार, उद्योग व व्यवसायाच्या संधींचा फायदा कोकणातील तरुणांना होऊ शकतो. पर्यटनाच्या दृष्टीनेही हा रेल्वेमार्ग उपयुक्त ठरेल. पर्यटक वैभववाडी किंवा कणकवली येथे उतरतील.
पर्यटक मार्गदर्शन केंद्र उभारल्यास मोठा फायदा होईल. हा मार्ग सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाणार आहे. त्यामुळे सध्या अविकसित असलेल्या भागाच्या विकासाला मोठी गती मिळेल. वैभववाडीसारख्या तालुक्यात एमआयडीसी, पर्यावरणपूरक उद्योग, फौंड्री व ऑटोमोबाईल उद्योग उभारण्याच्या संधी निर्माण होण्यास मदत होतील. कोकणातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे. भाजीपाला, फळे, धान्ये, बांधकाम साहित्य, घरगुती उपकरणे यांचा पुरवठा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातून होतो. त्यामुळे या रेल्वेमार्गाचा मोठा फायदा होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.