छत्रपती संभाजीनगर : होळी संपल्यानंतर महाराष्ट्रात तापमानाचा पारा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. एवढ्या कडक उन्हामुळे महाराष्ट्र अक्षरश: होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. असं वाटतंय की, राज्यावर सूर्यदेव कोपला आहे. त्याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. संभाजीनगरमधील सोयगाव येथे एका तरुणाचा मृत्यू झालाय. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे) येथील एका २५ वर्षीय तरुणाचा सोयगाव तालुक्यातील निमखेडी येथील बस स्टॉपवर काल मंगळवारी मृत्यू झाला.
वाढलेल्या या तापमानाचा या वर्षातील पहिला बळी काल मंगळवारी गेल्याचं स्पष्ट झालं. अमोल दामोदर बाविस्कर (वय २५) असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. अमोल हा सोमवारी भर उन्हात दुपारी ३ वाजता बनोटीहून गावी जाण्यास निमखेडी बस स्टॉपवर आला. बराच वेळ वाट पाहूनही वाहन न मिळाल्याने उन्हाचे चटके बसू लागल्याने तो बस स्टॉपवर बसला. रात्रीही तो बस स्टॉपवरवरच झोपल्याचं परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितलं. मंगळवारी सकाळी या बस स्टॉपवर त्याचा मृतदेह आढळला. सोयगावचे तापमान ३९ अंश सेल्सियस होते. दिवसभर अमोल उन्हात होरपळल्याने रात्री त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, असं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.
शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) या आठवड्याच्या शेवटपासून कमाल तापमान ३६ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत तापमान साधारण ३३ अंश सेल्सियसच्या आसपास आहे.
हवामान विभागानुसार, शनिवारपासून तापमान वाढू लागेल आणि ३१ मार्चपर्यंत ३५ अंश सेल्सियसपर्यंत घसरेल. या कालावधीत आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. एप्रिल १ ते ६ दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील काही भागांत प्री-मान्सूनच्या हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी IMDच्या कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान ३२.५ अंश सेल्सियस आणि सांताक्रूझ वेधशाळेत ३३.५ अंश सेल्सियस नोंदवले गेले. IMDच्या नोंदीनुसार, मुंबईत मार्च महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान २८ मार्च १९५६ रोजी ४१.७ अंश सेल्सियस नोंदवले गेले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.