सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी
Maharashtra Congress Setback : काँग्रेसला महाराष्ट्रात लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यानंतर, भोरचे माजी आमदार व काँग्रेसचे मातब्बर नेते संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे, ते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यातच काँग्रेसमध्ये आणखी एक राजीमाना पडला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा व सरचिटणीस पदाचा राजीनामा काँग्रेस पक्षाकडे सोपवला आहे. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसला नाराज नेतेमंडळींची मनधरणी करता येत नसल्याचेच दिसून येत आहे. पक्षातील नेतेमंडळींमध्ये समन्वय नसून अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्ते हताश असल्याची परिस्थिती काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.
रोहन सुरवसे पाटील यांनी काय म्हटले ?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या राजीनामा पत्रात रोहन सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे की, सरचिटणीस पदावर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला प्रमाण मानून आजपर्यंत मी काम केले. कुठल्याही गटातटाच्या भानगडीत न पडता माझ्या खांद्यावर पक्षाची जी जबाबदारी आहे ती लक्षात ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि पक्षाचे नाव चांगल्या पद्धतीने कायम अधोरेखित होईल अश्या आशयानेच मी आजवर काम करत आलोय. पक्षकार्यात मी नेहमीच सक्रियपणे काम केले आहे. जनप्रश्र्नांसाठी अनेक आंदोलने केली युवक काँग्रेसच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभागी राहिलो.
२०२१ सालच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सरचिटणीस पदावर निवडून आल्यानंतर संघटनेसाठी काम करत असताना या पदाला कायमच न्याय देण्याचे आणि पक्षाची गरिमा कायम राखण्यासाठी किंबहुना ती वृद्धिंगत करण्यासाठी मी सदैव कटिबध्द राहिलो आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेस हा एक विचार आहे. हा विचार आणि हा पक्ष आजही तळागाळातील आणि गावकुसातील सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय ते श्रीमंत अश्या सर्व स्तरातील लोकांना आपलासा वाटतो. मात्र, पक्ष संघटनेतील अनेक बाबी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पटत नाहीत. सध्या पक्ष अडचणीच्या काळातून जातोय तरीही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागतोय याचा विचार पक्षनेतृत्वाने करावा अशी माझी अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.