Jotiba Chaitra Yatra News : महाराष्ट्र- कर्नाटक- आंध्र मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा आज पार पडत आहे. दख्खनचा राजा जोतिबाच्या या सर्वात मोठ्या वार्षिक सोहळ्यासाठी पहाटेपासून धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. जोतिबाच्या नावाने "चांगभलं"चा जयघोष करत, गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविक सासनकाठ्यांसह जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. संपूर्ण परिसर गुलालाच्या लालिमेत न्हाऊन निघाला आहे. दरवर्षी सुमारे १० ते १५ लाख भाविक या यात्रेत सहभागी होतात. यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवस्था सज्ज ठेवली आहे.
यात्रेचा भव्य सोहळा
धार्मिक विधींची सुरुवात: मुख्य यात्रेच्या दिवशी पहाटे ३ वाजता जोतिबा मंदिरात धार्मिक विधींना प्रारंभ होईल. पहाटे ५ वाजता पन्हाळा तहसीलदारांच्या हस्ते शासकीय अभिषेक संपन्न होईल.
धुपारती आणि सासनकाठी मिरवणूक: सकाळी १० वाजता धुपारतीचा सोहळा पार पडेल. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेली सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी १२ वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पूजनाने सुरू होईल.
सासनकाठ्यांचा मान: मिरवणुकीत १०८ सासनकाठ्या सहभागी होतात. पहिला मान इनाम पाडळी (जि. सातारा) यांच्या सासनकाठीला असतो. त्यानंतर मौजे विहे (ता. पाटण), हिंमत बहादूर चव्हाण (करवीर, कोल्हापूर), कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या सासनकाठ्यांचा समावेश आहे. या सासनकाठ्या २० फुटांपासून ते ७०-८० फुटांपर्यंत उंच असतात.
पालखी सोहळा: हस्त नक्षत्रावर सायंकाळी ५:४५ वाजता जोतिबाची पालखी मिरवणूक तोफेच्या सलामीने मंदिरातून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होईल.
यमाई-जमदग्नी विवाह सोहळा: सायंकाळी ६:३० वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी आणि जमदग्नी यांच्या विवाहाचा धार्मिक विधी होईल. रात्री ८ वाजता पालखी पुन्हा जोतिबा मंदिराकडे प्रस्थान करेल. रात्री ९ वाजता पालखी मंदिरातील सदरेवर विराजमान होईल. रात्री १० वाजता तोफेच्या सलामीने पालखी सोहळा पूर्ण होईल. त्यानंतर आरती, अंगारा वाटप आणि रात्री ११ वाजता देवमूर्तीला शाही स्नान होईल. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.