Jagdamba Talwar and Vaghankha will be seen soon: महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त श्री. अॅलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने आज सकारात्मक प्रतिसाद दिला.
यासंदर्भात आज मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे अशी माहीती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ब्रिटनकडून जगदंब तलवार व वाघनखे शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
या चर्चेच्यावेळी ब्रिटीश उच्चायुक्तालयातील राजकीय विभाग विषयक उपप्रमुख श्रीमती इमोजेन स्टोन यादेखील उपस्थित होत्या. शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य शासन राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून मिळविण्याचा संकल्प सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
शिवराज्याभिषेक 350 व्या वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखं भारतात आणण्याबाबत मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ब्रीटनमधे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सुधीर मुनगंटीवार यांची बैठक आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या प्रस्तावित बैठकीत जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याविषयी तपशीलवार प्रक्रीया ठरविण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक 350 वा वर्षपूर्ती महोत्सव सुरू असतानाच जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणली जातील अशी शक्यता आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत ब्रिटीश उपउच्चायुक्त श्री अॅलन गॅम्मेल यांच्या झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, राज्य पुरातत्व संचालक तेजस गर्गे, चेतन भेंडे आणि मंत्री कार्यालयातील अन्य वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Latest Marathi News)
ब्रिटन-महाराष्ट्र सांस्कृतिक देवाण घेवाण होणार
ब्रिटन आणि भारत यांच्यात सांस्कृतिक देवाण घेवाणीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या सांस्कृतिक आदानप्रदानासाठी महाराष्ट्रातील कलाकार ब्रिटन मध्ये सादरीकरण करतील आणि ब्रिटनचे कलाकार महाराष्ट्रात येऊन आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतील.
त्याचबरोबर महाराष्ट्राचे 25 विद्यार्थी ब्रिटनमध्ये अभ्यासासाठी जातील आणि ब्रिटनचे 25 विद्यार्थी महाराष्ट्रात येतील. या सांस्कृतिक आदानप्रदानासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि ब्रिटीश सरकारमधे लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक संवादातून दोन्ही संस्कृतींना एक नवी उंची प्राप्त होईल असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. (Latest Political News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.