रत्नागिरी : राज्यात मुसळधार पावसाचा धडाका (Heavy Rainfall) सुरु असून रत्नागिरीलाही पावसाने झोडपले आहे. पावसाची संततधार सुरुच असल्याने काही ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. गोवा महामार्गावरील परशुराम घाटात (Parshuram Ghat) तीन ठिकाणी दरड कोसळल्याने (Landslide) वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. चौपदीकरणासाठी घाटाचे काम सुरु आहे. मात्र दरड कोसळल्याने घाटातील बांधकामावरही मोठा परिणाम झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सकाळपासून सूरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. वैभववाडीत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दुपारनंतर पावसाचा जोर अधिक होता. यावेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे वैभववाडी रेल्वे स्थानक परिसरातील रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. तब्बल एक ते दीड तास रेल्वे रुळावर पाणी साचले होते. मात्र, संध्याकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे रुळावरील पाणी ओसरले. त्यामुळे काहीकाळ विस्कळीत झालेली रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यातली कोसळधार सुरुच असून सखल भागांत पाणी साचले आहे. महाड शहरातून वाहणारी सावित्री आणि गांधारी नदी पूर रेषा ओलांडून वाहू लागली आहे. महाड शहरामध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहरातील सखल भागात नदीचे पाणी शिरले आहे. नागरिक आपले सामान आणि वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला सकाळपासून पावसानं झोडपलं आहे.अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूरच्या अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडलीय. त्यामुळे राजापूर शहरात पाणी शिरलेय. शहरातील जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरल्यानं व्यापार्याची तारांबळ उडाली. अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापूर जवाहर चौकात पाणी शिरलं आहे, तर बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी पाणी साचलं आहे. कोदावली आणि अर्जुना नदिनं पात्र सोडल्यानं पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालीय.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. दोन दिवसांपासून उन-पावसाचा लपंडाव नवी मुंबईत सुरू होता. मात्र, आज नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नवी मुंबईकरांना दिलासा मिळालाय. सकाळपासून 60 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस नवी मुंबईत बरसला असून मोरबे धरण क्षेत्रातही आज चांगला पाऊस पडला आहे.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.