जळगाव बाजारात सोने-चांदीच्या दरात घसरण
सोन्यात १३०९ रुपये, चांदीत ३०९० रुपयांची घट
जागतिक बाजाराचा परिणाम स्पष्ट
खरेदीदारांसाठी दिलासादायक परिस्थिती
संजय महाजन, जळगाव
सर्वत्र लग्नसराईचे वातावरण असताना शहरातील सुवर्ण बाजारपेठेत दिवसेंदिवस सोनं, चांदीच्या दरात सतत बदल होत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोने, चांदीचे दर वाढले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी मंगळवारी दोन्ही धातुंचे दर घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरातील बदल आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी-पुरवठ्याच्या स्थितीचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे.
भारतीय सराफा बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच किमतींमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये मंगळवारी सोमवारच्या तुलनेत सोन्याचे दर कमी झाले. ही घसरण जरी मोठी नसली तरी सतत बदलणाऱ्या ट्रेंडमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांमध्येही सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना सोन्याच्या किंमतीतील ही नरमाई खरेदीदारांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सध्या सोन्यावर दबाव कायम असल्याचे संकेत मिळत आहेत.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,७७९ रुपयांवर स्थिरावले होते. तर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी २०६ रुपयांची किंचित वाढ झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,९८५ रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १३०९ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,६७६ रुपयांपर्यंत खाली आले.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४५,१४० रुपयांवर स्थिरावले होते. तर सोमवारी ३०९० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,४८,२३० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ३०९० घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४५, १४० रुपयांपर्यंत खाली आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.