गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून कोल्हापुरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात
निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राजकीय संघर्ष आणखी तीव्र
सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कथित हस्तक्षेपावरून निशाणा साधला
गोकुळ दूध संस्थेच्या निवडणुकीनिमित्त कोल्हापुरातील आखाड्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडालाय. निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झाल असतानाच मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपावरुन काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केलाय. सतेज पाटलांनी नेमका काय निशाणा साधलाय ? आणि त्याला भाजप नेत्यांनी काय प्रत्युत्तर दिलंय? पाहूया एक रिपोर्ट.
कोल्हापुरची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संस्था निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलंय. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा असतानाच कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असं काँग्रेस नेते सतेज पाटलांनी स्पष्ट केलं आहे. गुरुवारी ते आपलं पॅनल जाहीर करणार आहेत.
त्यातच गोकुळमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपावरुन सध्या टीकेचा धुरळा उडतोय. यावर म्हशीची धार काढायची की नाही हे सुद्धा मुंबईतून ठरू नये, अशा शब्दात सतेज पाटलांनी टीका केली असतानाच विरोधकांचे आरोप नैराश्यातून होत असल्याचा पलटवार भाजप नेते धनंजय महाडीक यांनी केलाय. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवली जाईल आणि यात आपला हस्तक्षेप नसेल असं स्पष्ट केलंय. मात्र तरीही जागावाटपावरुन महायुतीत संघर्ष उडाला आहे. महायुतीचा फॉर्म्युला काय आहे पाहुयात.
राष्ट्रवादी - 10 जागा
शिंदेसेना - 7 जागा
भाजप - 6 जागा
जनसुराज्य - 2 जागा
गोकुळच्या खासगीकरणाचा घाट घातला होता. त्यासाठी कोट्यवधींचं आमिष मंत्री असताना आपल्याला दाखवलं होतं, असा दावा माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नुकताच कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना केला होता. त्यामुळे खासगीकरण आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाचा मुद्दा विरोधकांच्या हाती आलाय. आता राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ मित्र पक्षांना सोबत घेऊन सत्ता कायम राखतात की कोल्हापुरच्या आखाड्यात विरोधकांचा डाव सत्ताधाऱ्यांना चितपट करणार ते पाहणे महत्वाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.