संजय सूर्यवंशी| नांदेड, ता. ११ सप्टेंबर २०२४
Bhaskar Patil Khatgaonakr News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. लोकसभेआधी महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपकडे गेलेले अनेक बडे नेते सध्या परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. लोकसभेच्या आधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ भास्कर पाटील खातगावकरही भाजपमध्ये गेले होते. मात्र विधानसभेच्या आधी ते स्वगृही परतणार असून भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह दोन माजी आमदार आणि त्यांच्या सुनबाई काँग्रेस प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माजी मुख्यमंत्री भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचे भाऊजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे लवकरच चव्हाणांची साथ सोडून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 15 तारखेला खतगावकर हे काँग्रेसमध्ये अधिकृत पक्ष प्रवेश करू शकतात. त्यांच्यासोबत दोन माजी आमदार आणि खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर ह्या देखील पक्ष प्रवेश करण्याची शक्यता आहे.
माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे हे दोन माजी आमदार, भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सोबत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. हा अशोक चव्हाण यांना मोठा धक्का मनाला जात आहे. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर ह्या नायगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना नांदेड दक्षिण मधून उमेदवारी मिळू शकते. तर माजी आमदार अविनाश घाटे यांना देगलूर विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्याची दाट शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात या पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे
दरम्यान, काँग्रेसची साथ सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांना एकाच आठवड्यात राज्यसभेवर संधी देण्यात आली. मात्र त्यांच्याचसोबत आलेल्या भास्कर पाटील खतगावकर यांना अद्याप कोणती संधी न मिळाल्याने ते भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे लोकसभेतही भाजपला धक्का देत काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी बाजी मारली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले.
त्यामुळे विधानसभेसोबतच नांदेड लोकसभेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे नायगाव विधानसभेसाठी काँग्रेसला तगडा उमेदवार शोधावा लागणार आहे. हीच संधी साधून खतगावकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.