छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसीत बनावट ₹५०० नोटांचा कारखाना उद्ध्वस्त.
पोलिसांनी ५९.५० लाखांच्या बनावट नोटा, मशीनरी, शाई आणि साहित्य जप्त केले.
सात जण अटकेत; मुख्य सूत्रधार अंबादास ससाणे फरार.
कारखाना चालवण्यासाठी भाड्याने घेतलेली जागा, वाहनं व खाते साथीदारांच्या नावावर होती.
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसीमध्ये सुरू असलेला बनावट नोटांचा छपाई कारखाना अहिल्यानगर पोलिसांनी उद्ध्वस्त केला. गेल्या ४ वर्षांपासून ५०० च्या बनावट नोटा छापून ३ जिल्ह्यांतील बाजारात वापरात आणत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५०० रुपयांच्या ५९.५० लाखांच्या बनावट नोटा, २७.९० लाखांची मशिनरी, शाई, कागद आणि इतर साहित्य जप्त केले.
अहिल्यानगर पोलिसांनी ही कारवाई करत ७ जणांना अटक केली. दरम्यान,सनोटांच्या छपाईसाठी भोपाळहून शाई आणि कागद खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आहे. अहिल्यानगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे पकडलेल्या ८० हजारांच्या बनावट नोटांचे छत्रपती संभाजीनगर व बीड कनेक्शन तपासात समोर आले. त्यानंतर वाळूजमध्ये कारवाई केली.
निखिल शिवाजी गांगर्डे (२७, रा. कुंभळी ता. कर्जत) व सोमनाथ माणिक शिंदे (२५, रा. अहिल्यानगर) या दोघांना सुरुवातीला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत या नोटा बीडमधील व्यक्तीकडून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर प्रदीप संजय कापरे (२८, रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे तपासानंतर छत्रपती संभाजीनगर येथून हे रॅकेट चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर वाळूजमध्ये बनावट नोटांचा कारखाना चालवला जात असल्याचे उघड झाले. तेथून पोलिसांनी मंगेश पंढरी शिरसाठ (४०, रा. शिवाजीनगर, जि. छत्रपती संभाजीनगर), विनोद दामोधर अरबट (५३, रा. सातारा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर), आकाश प्रकाश बनसोडे (२७, रा. निसर्ग कॉलनी, पेठेनगर, जि. छत्रपती संभाजीनगर), अनिल सुधाकर पवार (३४, रा. मुकुंदनगर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले.
अंबादास रामभाऊ ससाणे (रा. शहर टाकळी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) हा मुख्य आरोपी मात्र पसार झाला. मुख्य आरोपी ससाणे हा सन २०२१ पासून बनावट नोटा छपाई करून त्या एजंटांमार्फत चलनात आणण्याचा व्यवसाय करत होता. त्याच्या समवेत शिरसाठ व बनसोडे हे दोघे त्याला छपाई, कटिंगसाठी मदत करत होते. ससाणे याची वाहने, बँक खाते, व्यवसायासाठी भाड्याने घेतलेली जागाही शिरसाठच्या नावे होती. कागद, शाई व इतर साहित्य ससाणे हाच आणून द्यायचा, असे प्राथमिक तपासात समोर आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.