संजय राठोड, साम टीव्ही
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील बेसा येथे लागलेल्या भीषण आगीत एका गरीब शेतकऱ्याचा कष्टाचा आधारच जळून खाक झाला. गोठ्यात बांधून ठेवलेल्या आठ बकऱ्या जिवंत जळाल्याने बकरीपालक शेतकरी दत्तू गोहोकार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.दत्तू गोहोकार हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीसोबतच बकरीपालन व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
त्यांनी नेहमीप्रमाणे बकऱ्यांना चारण्यासाठी शेतात नेले होते. दुपारच्या सुमारास बकऱ्यांना गोठ्यात बांधून ते घरी परतले. मात्र काही वेळातच गोठ्यातून धुराचे लोट उठू लागले आणि क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले.
गोठ्यात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या चाऱ्यामुळे आगीने वेगाने फैलाव घेतला. ज्वाळांनी संपूर्ण गोठा वेढल्याचे पाहून ग्रामस्थ घटनास्थळी धावले. बादल्या,पाण्याचे टँकर आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आगीची तीव्रता एवढी प्रचंड होती की, गोठ्यात अडकलेल्या आठही बकऱ्यांना बाहेर काढण्यापूर्वीच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वणी येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गोठा, चारा आणि इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले होते.दरम्यान,आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.