अंबरनाथ शहरातील (Ambarnath City) मोरिवली पाड्याचं डम्पिंग बंद करून हे डम्पिंग आता चिखलोलीच्या सर्वोदय नगर परिसरात सुरू करण्यात आलं आहे. मात्र या डम्पिंगला इथल्या नागरिकांचा तीव्र विरोध आहे. आम्ही आधी आमच्या घराच्या बाजूलाच कोविड हॉस्पिटल सुरू करताना सहकार्य करून अंबरनाथकरांना जीवदान दिलं, पण अंबरनाथकरांनी मात्र आता आमच्या माथी डम्पिंग मारून आमचा गळा घोटला, अशा उद्विग्न भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. अंबरनाथ शहराच्या मोरिवली पाड्यात अंबरनाथ पालिका गेली अनेक वर्ष अनधिकृतपणे कचरा टाकत होती. याचा इथल्या नागरिकांनी अनेकदा विरोध केला होता. या डम्पिंगच्या समोरच न्यायालयाची इमारत बांधून तयार झाल्यानंतर न्यायालयानं या अनधिकृत डम्पिंग बाबत प्रश्न उपस्थित केले. यानंतर मात्र अंबरनाथ नगरपालिकेनं हे डम्पिंग ग्राउंड चिखलोली परिसरातल्या सर्व्हे क्रमांक १३२ वर स्थलांतरित केलं.
मात्र या ३२ एकरांच्या भूखंडावर ज्या भागात कचरा टाकला जातोय, त्याच्या अगदी बाजूलाच रहिवासी इमारती आहेत. त्यामुळं साहजिकच इथं लाखो रुपयांची घरं घेऊन राहायला आलेल्या नागरिकांनी या डम्पिंगला तीव्र विरोध केला. हा भूखंड कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी राखीव असला, तरी तो ३२ एकरांचा असल्यानं कचरा रहिवासी भागाच्या बाजूलाच का टाकला जातो? असा रहिवाशांचा सवाल आहे. याच प्रश्नावरून आता नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आम्ही आयुष्याची पुंजी खर्चून याठिकाणी घरं घेतली असून त्याच्या बाजूलाच अशा पद्धतीने डम्पिंग सुरू झालं, तर आम्ही जगायचं कसं? असा प्रश्न इथल्या नागरिकांनी विचारला आहे. सोबतच अंबरनाथ शहरातील कोव्हीड सेंटर आमच्या घराच्या बाजूलाच असलेल्या डेन्टल कॉलेजमध्ये सुरू झालं, त्यावेळी आम्ही सहकार्य केलं, अंबरनाथकरांना आम्ही जीवनदान दिलं, मात्र आता या मोबदल्यात आमच्या बाजूला डम्पिंग सुरू करून अंबरनाथ पालिका आमचा गळा घोटत असल्याच्या उद्विग्न भावना या रहिवाशांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच हे डम्पिंग बंद झालं नाही, तर आम्ही कचऱ्याच्या गाड्यांसमोर झोपू आणि आत्महत्या करू, असा उद्विग्न इशारा इथल्या नागरिकांनी दिला आहे.
चिखलोली परिसरात मागील काही वर्षांपासून नव्यानं मोठ्या प्रमाणात गृहसंकुलं उभी राहिली आहेत. अजूनही या भागात नवनवीन प्रकल्प उभे राहतायत. या भागाची सध्याची लोकसंख्या जवळपास २५ ते ३० हजारांच्या घरात आहे. मात्र असं असूनही अंबरनाथ पालिका आपल्या समस्येकडे लक्ष देत नसल्याचा इथल्या रहिवाशांचा आरोप आहे. अंबरनाथ पालिका येत्या काळात बदलापूरजवळ अंबरनाथ आणि बदलापूर यांचा सामायिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार असून त्यामुळं तो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याच जागेत हा कचरा टाकावा, अशीही इथल्या रहिवाशांची मागणी आहे.
अंबरनाथ पालिकेनं या सगळ्याबाबत कॅमेरासमोर सध्यातरी काहीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. मात्र पालिका अधिकाऱ्यांच्या मते हा भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी राखीव असून इथल्या बिल्डरांना याची माहिती असणं स्वाभाविक आहे. त्यामुळं ही बिलरांनी केलेली नागरिकांची फसवणूक आहे, असा दावा पालिकेचे अधिकारी करतात. मात्र दुसरीकडे याच अंबरनाथ पालिकेने या बिल्डरांना बांधकामाची परवानगी कशी दिली? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळं अंबरनाथ शहरात नव्यानं वास्तव्याला आलेल्या या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांनी काहीतरी ठोस निर्णय घेणं गरजेचं बनलं आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.