राज्य सरकार लंडनहून आणत असलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत का? याबाबत निश्चित अशी माहिती नाही, असं पत्र व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं दिलंय. म्युझियमसोबत केलेल्या पत्रव्यवहारातून ही माहिती समोर आल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय.
अफजल खानाचा वध केलेली वाघनखं लंडनमध्ये नसून ती साताऱ्यातच छत्रपतींच्या राजवाड्यात आहेत, असा दावाही सावंत यांनी केलाय. त्यामुळे लंडनमधल्या वाघ नखांवरून पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले की, ''संग्रहालयाने स्वतः सांगितलं आहे की, ही वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत. तसेच ही वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत, असा लेबल लावण्यास संग्रहालयाने महाराष्ट्र शासनातील अधिकारी आणि मंत्र्यांना सांगितलं आहे. असं सांगितलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे मंत्री आणि अधिकारी खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही, ती गोष्ट महाराजांची आहे, असं सांगत त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहेत.''
सावंत म्हणाले की, ''सातारा येथील महाराजांच्या राजवाड्यातील देवघरात अनेक लोकांनी शिवाजी महाराजांची वाघनखं पाहिली आहेत. माझ्याकडे शेवटचा लिखित स्वरूपातील पुरावा आहे. हा पुरावा १९४४ चा आहे. 'The Imperial Guide to India', या पुस्तकाच्या लेखकाने १९४३ साली साताऱ्यात भेट दिली. या भेटीत त्यांनी अफझल खान याला मारण्यासाठी वापण्यात आलेली शिवाजी महाराजांची खरी वाघनखं पाहिली असल्याची नोंद केली आहे.''
दरम्यान, लंडनमधील वाघनखं शिवरायांचीच असल्याचं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखाने अफझल खान याचा वध केला, ती वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत. हा खूप जुना इतिहास असून यासाठी पूर्वीची संदर्भ सुद्धा आहेत. त्यामुळे जेव्हा राज्य सरकारने महाराजांची वाघनखं आणि तलवार आणण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतली. तरी सुद्धा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचं याबाबतीत काही वेगळं म्हणणं असेल तर, आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची जी शंका असेल ती दूर केली जाईल.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.