

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाच्या सरी बरसल्या
पहाटेपासून ढगाळ वातावरण आणि अचानक पावसाने गोंधळ घातला
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पाऊस पडत आहे
राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान १० अंशांखाली गेले आहे
नववर्षांचे देशभरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्रभर पार्टी करण्यात आली. पण नवीन वर्षाची पहाट होताच मुंबईकरांना खास सरप्राईज मिळाले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बसरल्या. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचा गोंधळ उडाला. नवीन वर्षाचे स्वागत पावसाने झाल्याने सर्वत्र चर्चा होत आहे.
मध्यरात्रीपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण होते. पहाटेपासून मुंबईत पावसाला सुरूवात झाली. मुंबईतील कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, साकिनाका, बीकेसी याठिकाणी पाऊस पडला. त्याचसोबत कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईच्या काही ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावली. अचानक पाऊस आल्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कामासाठी घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची चांगलीच तारांबळ उडाली. छत्री सोबत नसल्यामुळे अनेकांना भिजत प्रवास करावा लागला.
मुंबईत जरी पाऊस पडत असला तरी राज्यातील इतर ठिकाणी कडाक्याची थंडी कायम आहे. थंडीची लाट असल्याचे हवामान खात्याने अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी देखील तापमानाच्या पाऱ्यात कमालीची घसरण झाली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये १० अंश सेल्सिअलच्या खाली तापमान गेले आहे. सकाळी आणि रात्री गारठा प्रचंड वाढत आहे. राज्यात पुढील दोन दिवस किमान तापमानातील घट कायम राहण्याचा आणि पुढच्या दोन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानात कमालीची घसरण झाली आहे. मराठवाड्यातील परभणी येथे सर्वात कमी ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथे ७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड, जेऊर, गोंदिया, नागपूर, अमरावती येथे ९ अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. तर अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, भंडारा आणि वर्धा येथे १० अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.