विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप
भाजप आणि शिंदेसेनेमधील मतभेदांमुळे राजकीय वातावरण तापले
माजी भाजप खासदार हिना गावित यांनी भाजपच्या स्वबळाच्या तयारीबाबत विधान केले
सागर निकवाडे,साम प्रतिनिधी
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर महायुतीमधील वाद विकोपाला जाताना दिसतोय. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मोठा पराभव पत्कारावा लागला. या पराभवाचे खापर भाजपनं थेट शिंदेसेनेवर फोडलंय. या वादाचा दुसरा अंकाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल असा अंदाज आहे.
नंदुरबारमधील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपनं स्वबळाची तयारी सुरू केलीय. नंदुरबारच्या माजी भाजप खासदार हिना गावित यांनी सांगितले की, महाराष्ट्रतील आगामी जिल्हा परिषद (ZP) निवडणुका भाजप स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहे. परंतु याबाबत काही वेगळ्या निर्णय घेण्याची वेळ आली तर पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील, असंही हिना गावित म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीवरून भाजप आणि त्यांचा सत्ताधारी युतीतील भागीदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर गावित यांनी हे विधान केलंय. २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानानंतर सत्ताधारी महायुतीला पाचपैकी केवळ दोन जागा जिंकता आल्या. यानंतर शिवसेना नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्याचा परिणाम आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये दिसू लागलाय. नंदुरबारमध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी थेट एकला चलो रे चा नारा दिलाय.
दरम्यान स्वबळावर निवडणुका लढायच्या आहेत की युतीत याचा निर्णय हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी घेतील, असं त्या एका कार्यक्रमात म्हणाल्या आहेत. पण सध्या तरी आपण स्वबळावरच निवडणुका लढणार असल्याचं गृहीत धरा असं हिना गावित यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना सांगितलंय. भाजपच्या नेत्यानं केलेल्या विधानामुळे महायुतीमधील वाद अजून वाढतील अशी शक्यता वर्तवली जातेय.
या निवडणूक निकालावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडलीय. भाजपने भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करत शिंदेसेनेवर आरोप केले. त्यानंतर महायुतीत वादाचे तडे पडल्याचं दिसून आलं. त्याचा परिणाम येत्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत पडणार असल्याच चिन्हे दिसून येत आहेत.
विधान परिषद निकालानंतर शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद वाढलेत. त्याच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी धक्कादायक विधान केलंय. येत्या तीन-चार महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. यासह एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असाही दावा त्यांनी केलाय.
विधान परिषदेच्या निकालानंतर भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवलीय. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही वाद नाही. कोणतीही धुसफूस नाहीये. पण नवनाथ बन यांनी पातळी पाहून टीका करावी. अन्यथा त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता आहे का, असा सवाल आम्हीही उपस्थित करू शकतो, असं शिरसाट म्हणालेत. दुसरीकडे रवींद्र धंगेकर आणि नवनाथ बन यांच्यात शाब्दिक वाद सुरूय.
या वाढत्या राजकीय वादाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना नेते, प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत निर्माण झालेला विसंवाद अजिबात वाढवू नका, असे स्पष्ट निर्देश एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत दिलेत.