Bharati Vidyapeeth Founder Patangrao Kadam Success Story:  Saamtv
महाराष्ट्र

Patangrao Kadam Success Story: 'शिक्षणसम्राट ते सहृदयी लोकनेता', वयाच्या २० व्या वर्षी विद्यापीठाची स्थापना; पतंगराव कदमांचा संघर्ष साधा नाही

Gangappa Pujari

Patangrao Kadam Life Journey Struggle Story: राष्ट्रीय काँग्रेसचे दिवंगत नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती, माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व 'लोकतीर्थ' स्मारकाचा लोकार्पण सोहळा सांगलीमध्ये पार पडला. ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनाच्या मुहूर्तावर या पुतळ्याचे अनावरण झाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार आदी दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात जन्मलेला एक पोरगा वयाच्या २४ व्या वर्षी विद्यापीठ काढतो, राज्यातील यशस्वी राजकारणी अन् शिक्षणसम्राट होतो हा प्रवास काही सोपा नाही. लोकनेता ते शिक्षणसम्राट असा प्रवास केलेल्या पतंगराव कदम यांचा यशस्वी प्रवास एकदा जाणून घ्याच.. (Dr Patangrao Kadam’s Statue to be Unveiled on Teacher's Day)

खेडेगावात जन्म

राजकारणात जायचं म्हणलं की राजकीय पार्श्वभूमी हवी. पण महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक नेते होऊ गेले ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. यापैकीच एक नाव म्हणजे स्वर्गीय पतंगराव कदम. गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या पतंगराव कदम यांनी महाराष्ट्रातच नव्हेतर देशाच्या विविध भागात शिक्षण संस्थांचे जाळे उभे केले. सांगली जिल्ह्यातील एका दुष्काळग्रस्त भागात, साधारण ८०० लोकसंख्या असलेल्या सोनसळ या खेड्यामध्ये ८ जानेवारी १९४४ मध्ये पतंगराव कदम यांचा जन्म झाला.

घरची गरिबी, संघर्षातून शिक्षण

घरची गरिबी, आई- वडील शेतकरी त्यामुळे पतंगराव कदम यांनी लहानपणापासून संघर्ष केला. गावात शाळा नसल्याने ते दररोज ५ किलोमीटरची पायपीट करत दुसऱ्या गावामध्ये शिक्षणासाठी जायचे. कुंडलमधील वसतीगृहात त्यांनी १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे कमवा आणि शिका या योजनेखाली शिक्षण घेऊ लागले.

भारती विद्यापीठाची स्थापना!

१९६१ मध्ये पतंगराव कदम शिक्षणासाठी पुण्यामध्ये आले. रयत शिक्षण संस्थेच्याच एका शाळेमध्ये शिकत असताना त्यांनी कायद्याची पदवी घेतली. हे शिक्षण घेत असतानाच आपले एक विद्यापीठ असावे अशी इच्छा त्यांच्या मनात होती. पुढे त्यांनी '१९८० च्या दशकातील शैक्षणिक प्रशासनातील प्रशासकीय समस्या' या विषयावर डॉक्टरेट मिळविली आणि फक्त वयाच्या विसाव्या वर्षी १९६४ मध्ये पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. पुण्यतल्या सदाशिव पेठेतील एका दहा बाय दहाच्या खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली, असे पतंगराव कदम स्वतः अनेक भाषणांमध्ये सांगायचे.

  यशस्वी शिक्षणसम्राट

भारती विद्यापीठाच्या स्थापनेनंतर सुरु झाला सांगलीच्या एका खेडेगावात जन्मलेल्या पोराचा शिक्षणसम्राट होण्याचा प्रवास. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठाचे फक्त संस्थापक नसून कुलगुरु देखील होते. आज पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशी विविधे क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकविणारी १८० शाळा आणि कॉलेज आहेत. या शाळांमध्ये त्यांत दीड लाखहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत. राज्यातच नव्हे तर नवी दिल्ली आणि दुबईमध्येही पतंगराव कदम यांच्या शाळा आहेत.

यशस्वी राजकारणी...

एकीकडे शिक्षणसम्राट म्हणून भरारी सुरु असतानाच पतंगराव कदम यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातही घट्ट पाय रोवले होते. पतंगराव कदम हे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या भिलवडी - वांगी मतदारसंघातून १९८५ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. १९९० मध्ये प्रथम ते राज्याचे शिक्षणमंत्री बनले. १९९२ साली शिक्षण व पाटबंधारे खात्याचे मंत्री, १९९९ ते २००४ या काळात त्यांनी उद्योग, वाणिज्य, संसदीय कामकाजमंत्री नोव्हेंबर २००४मध्ये ते सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री आणि मार्च २००९ मध्ये अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते वनमंत्री झाले. तसेच तब्बल सात वेळा ते विधानसभेवरही निवडून आले.

चौथीला 5 किलोमीटर चालत जाणारा विद्यार्थी वयाच्या 20 व्या वर्षी विद्यापीठ स्थापन करतो, 24 व्या वर्षी एस. टी महामंडळाचा सदस्य होतो, 7 विधानसभा जिंकतो, 25 वर्षे मंत्रिमंडळात राहतो, हे सर्व अकल्पनीय आहे. लाखो विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण, हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी देणे. थोडक्यात काय तर हा अवलिया जनसेवेसाठीच जन्माला आला होता. एका जन्मात शेकडो लोकांचे काम केलेल्या पतंगराव कदम यांच्या कार्याला कडकडीत सलाम.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT