योगेश काशिद, बीड प्रतिनिधी
Minor rape victim medical examination controversy in Beed : बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आणखी एक धक्कादायक आणि असंवेदनशील कारभार समोर आला आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन बलात्कार पीडितेची वैद्यकीय तपासणी (Medical Test) स्त्रीरोगतज्ज्ञांऐवजी चक्क एका भूलतज्ज्ञाकडून (Anaesthetist) करून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे संबंधित भूलतज्ज्ञाला पॉक्सो (POCSO) प्रकरणांमधील तपासणीचा कोणताही अनुभव किंवा प्रशिक्षण नाही. या गंभीर प्रकारामुळे बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या एकूणच कारभारावर आणि मानसिकतेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
१३ वर्षांच्या अल्पवयीन पीडितेला तब्बल १० तास ठेवले ताटकळत ठेवण्यात आले. संबंधित भूलतज्ज्ञाला 'पॉक्सो' प्रकरणांची तपासणी करण्याचा अनुभव नसल्याचे समोर आले आहे. अनुभव नसतानाही वैद्यकीय अधीक्षकांकडून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने भविष्यात न्यायालयीन प्रक्रियेवर आणि निकालावर गंभीर परिणामांची भीती. या प्रकारावरून वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, बालहक्क समिती आणि कायदेतज्ज्ञांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी २६ मे रोजी रात्री ८ वाजेपासून ते २७ मे रोजी पहाटे ३:५५ वाजेपर्यंत वेळ घालवला. त्यामुळे पीडितेला आणि तिच्या नातेवाइकांना संपूर्ण रात्र पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर काढावी लागली. पोलिसांच्या या दिरंगाईनंतर, २७ मे रोजी सकाळी ११ वाजता पीडितेला केज उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. मात्र, तिथेही तिला तब्बल १० तास ताटकळत ठेवण्यात आले आणि रात्री ९ वाजता तिचा वैद्यकीय अहवाल देण्यात आला. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या या असंवेदनशील आणि छळवादी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ज्या भूलतज्ज्ञाने ही वैद्यकीय तपासणी केली, त्यांनी आपल्याला या संदर्भातील कोणताही अनुभव किंवा प्रशिक्षण नसल्याचे लेखी पत्र वैद्यकीय अधीक्षकांना दिले होते. 'असे संवेदनशील प्रकरण कसे हाताळायचे, याची मला माहिती नाही' असे स्पष्टपणे सांगितलेले असतानाही, वैद्यकीय अधीक्षकांनी त्यांनाच पॉक्सो अंतर्गत तपासणी करण्यास भाग पाडले.
"१३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिला तातडीने वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे होते. अशा वेळी महिला स्त्रीरोगतज्ज्ञ असणे कायद्याने बंधनकारक आहे. अल्पवयीन पीडितेच्या शरीराला झालेल्या इजा किंवा उपचारांबाबत एका भूलतज्ज्ञाला काय माहिती असणार? आधीच अत्याचार सोसलेल्या पीडितेचा पोलीस आणि आरोग्य विभागाने मिळून मानसिक छळ केला आहे. दोषींवर तातडीने कडक कारवाई झालीच पाहिजे."मनीषा तोकले (सामाजिक कार्यकर्त्या)
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO) पीडितेची वैद्यकीय तपासणी ही महिला स्त्रीरोगतज्ज्ञांनीच करणे आवश्यक आहे. भूलतज्ज्ञांनी जर ही तपासणी केली असेल, तर ते कायद्याला धरून नाही. न्यायालयीन प्रक्रियेत आणि आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात याचा मोठा फटका बसेल, अशी संतप्त प्रतिक्रिया बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी दिली. तर जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे म्हणाले की, अल्पवयीन पीडितेची वैद्यकीय तपासणी करताना कमालीची अचूकता आणि काळजी घेणे गरजेचे असते. भूलतज्ज्ञाकडून ही अचूकता (Accuracy) येऊ शकत नाही. केज उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भूलतज्ज्ञाला तपासणी करायला लावणे ही अक्षम्य चूक आहे. या निष्काळजीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
"बाल लैंगिक अत्याचाराच्या संवेदनशील प्रकरणांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांनीच वैद्यकीय तपासणी करणे आणि तसा अहवाल तयार करणे कायद्याने अपेक्षित आहे. कोर्टात साक्ष नोंदवताना किंवा उलटतपासणी दरम्यान या त्रुटीचा आरोपीला फायदा मिळू शकतो आणि खटल्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो."ॲड. सुभाष शिंदे (ज्येष्ठ विधीज्ञ)
बीड जिल्ह्यामध्ये बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ होत असताना, दुसरीकडे आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून हलगर्जीपणाचा कळस पाहायला मिळत आहे. एका पीडितेला तब्बल २७ तास उपाशीपोटी पोलीस आणि रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. केज उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध असतानाही भूलतज्ज्ञाला ड्युटी देणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.