योगेश काशिद, बीड प्रतिनिधी
Tukaram Munde kidnapping case in Parli : राज्यभरात गाजलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना अजून ताजी असतानाच, आता बीडच्या परळीतून एका गुत्तेदाराचे (कंत्राटदार) अपहरण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ४ जून रोजी परळीतील औष्णिक विद्युत केंद्रासमोरील रस्त्यावरून तुकाराम मुंडे या गुत्तेदाराचे अपहरण करण्यात आले होते.
या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तातडीने एक पथक स्थापन केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या २४ तासांत पोलिसांनी तपास चक्रे फिरवून अपहृत गुत्तेदाराची सुखरूप सुटका केली. ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
तुकाराम मुंडे ज्या औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटदार म्हणून काम करत होते, त्याच केंद्रातील मुख्य अभियंत्याच्या गाडीवरील चालक संतोष वंजारी याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्वप्रथम ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इतर तीन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. मात्र, या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
तुमच्यामुळे साहेबांचे ५ कोटींचे नुकसान झाले...
अपहरणादरम्यान आरोपींनी तुकाराम मुंडे यांना धमकावत म्हटले की, "तुझ्यामुळे आमच्या साहेबांचे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे आम्हाला तुझ्याकडून पाच कोटी रुपये हवे आहेत." यावर मुंडे यांनी विचारले, "मी तुमच्या साहेबांचे काय नुकसान केले आहे? मला त्यांच्याशी बोलू द्या." त्यावर आरोपींनी, "आमचे साहेब असे कोणाशी बोलत नाहीत," असे म्हणत मुंडे यांना दमदाटी केली. दरम्यान, पोलीस आपल्या मागावर असल्याचा सुगावा लागताच आरोपींनी मुंडे यांच्या डोळ्यांना पट्टी बांधली आणि त्यांना अमरावती जवळील हिंगणघाट परिसरात सोडून दिले.
तुकाराम मुंडे सुखरूप परत आले असले, तरी त्यांच्या अपहरणाच्या या घटनेने बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख यांच्या थरारक अपहारानाची आठवण करून दिली आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला कधी पकडणार? आणि या कटामागे औष्णिक विद्युत केंद्रातीलच काही बडे अधिकारी सामील आहेत का? अशी जोरदार चर्चा सध्या परळीत सुरू आहे.
मदत करणाऱ्या पाचव्या आरोपीलाही अटक करा; तुकाराम मुंडे यांची मागणी
या संदर्भात साम टीव्हीशी बोलताना तुकाराम मुंडे म्हणाले, "या चार आरोपींना परळीत मदत करणारा पाचवा व्यक्ती कोण आहे? त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. आरोपी गुन्हा करण्यापूर्वी चार दिवस परळीत थांबले होते. ते कुठे राहिले आणि त्यांना कोणी कोणी मदत केली, या सर्वांची कसून चौकशी करून त्यांना सह-आरोपी करण्यात यावे, असे निवेदन मी पोलीस प्रशासनाला देणार आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.