Maharashtra : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी तिसऱ्या भाषेच्या पर्यायामध्ये हिंदी सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा ५ जुलै रोजी मुंबईत होणार आहे. मात्र, या मोर्च्याआधीच महायुती सरकारकडून हिंदी सक्तीच्या निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले आहेत.
'मी माझी भूमिका मांडली आहे. आज आमची कॅबिनेट मीटिंग असते, तिथे आम्ही त्यावर चर्चा करु. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना भाषा शिकता यावी असं वाटत असतं. मराठी ही आपली मातृभाषा आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुद्धा आपण मराठी अनिवार्य केली आहे. आता दुसऱ्या मुद्द्यावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत, प्रत्येक जण आपली भूमिका मांडत आहे. पहिली मध्ये शिकणाऱ्यांना इंग्रजी आणि मराठी शिक्षण द्यावे आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावी. जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला हिंदी सुद्धा लिहिता वाचता येतं. मराठी शिकलं की हिंदी पण येतं, लिपी तीच आहे. विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो', असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
'कोणी कोणाला विरोध करायचा यात आमचा काय संबंध आहे. कोणी एकत्र यावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, यात आपण लोकांनी नाक खुपसायचं काय कारण आहे. आपण ही त्यांना म्हणलं नव्हतं की वेगवेगळं व्हा, त्यांनी काय करावं, त्यांच्या त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, घटनेने सगळ्यांना अधिकार दिला आहे. मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे', असे वक्तव्य उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सारथीचे संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉ. नवनाथ पालकर, किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन असून या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होण्यासाठी सारथीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्याथ्यांना मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.