भरत मोहळकर, साम प्रतिनिधी
Maharashtra Political Updates in Marathi: राज्यात विधानसभेचे पडघम वाजू लागलेत. त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राजकीय डाव टाकत दादांच्या पक्षाच्या नेत्यांच्या मुलांना गळाला लावायला सुरुवात केलीय. त्यातच गोकुळ झिरवळांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागताचे बॅनर लावलेत. एवढंच नाही तर गोकुळ झिरवळांनी गळ्यात तुतारीचं उपरणं घालून शिवस्वराज्य यात्रेतही सहभाग घेतलाय. त्यामुळे दिंडोरीत वडील नरहरी झिरवळ विरुद्ध मुलगा गोकुळ झिरवळ यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र झिरवळच नाही तर दादांच्या इतर नेत्यांची मुलंही साहेबांसोबत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
धर्माराव बाबा आत्रामांची मुलगी भाग्यश्री आत्राम शरद पवार यांच्या गटात.
राजेंद्र शिंगणेंची पुतणी गायत्री शिंगणेंनीही तुतारी फुंकली
इंद्रनील नाईकांचे बंधू ययाती नाईक तुतारी फुंकण्याची शक्यता.
लोकसभेला मुसंडी मारल्याने शरद पवारांच्या पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय. तर अजित पवारांच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झालीय. त्यापार्श्वभूमीवर थेट नेत्यांना परत न घेता त्यांच्या मुलांची मोट बांधून तरुणाईसह शरद पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र पवारांची ही रणनीती यशस्वी ठरणार का? याकडे लक्ष लागलंय.