Heart Attack Warning Signs saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack Warning Signs: हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देतं हे 3 संकेत; थकवा समजून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

हृदयाशी संबंधित समस्या नेहमीच छातीत दुखण्याच्या स्वरूपात दिसतील असं नाही. चालताना धाप लागणे, सतत थकवा, पायांना सूज आणि काही पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन यांसारखी लक्षणेही दुर्लक्षित करू नयेत. ही लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तपासणी घेणे महत्त्वाचे आहे.

Surabhi Jayashree Jagdish

हार्ट अटॅक हा जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. मात्र हृदयाशी संबंधित गंभीर समस्या अचानकच समोर येतात असं नाही. अनेकदा शरीर आधीच काही छोटे संकेत देत असतं. मात्र, थकवा, वय वाढणं किंवा रोजच्या धावपळीचा परिणाम म्हणून आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित धोका लक्षात येण्यास उशीर होऊ शकतो.

कार्डिओव्हॅस्क्युलर रिसर्च सायंटिस्ट डॉ. जेम्स डी निकोलॅन्टोनियो यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हृदयाशी संबंधित काही सुरुवातीच्या संकेतांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिलाय. त्यांच्या मते हे संकेत वेळेत ओळखले तर गंभीर हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी किंवा त्यावर वेळीच उपचार सुरू करण्यासाठी मदत होऊ शकते.

यातील तीन महत्त्वाचे संकेत कोणते ते जाणून घेऊया.

लैंगिक समस्या म्हणजे हृदयासाठीही इशारा?

पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन (Erectile Dysfunction) म्हणजे लैंगिक संबंधांच्या वेळी लिंगामध्ये पुरेसा ताठरपणा न येणं किंवा तो टिकून न राहणं. ही समस्या केवळ लैंगिक आरोग्याशी संबंधित आहे असं समजलं जातं. मात्र, काही वेळा ती हृदयाच्या आरोग्याशीही जोडलेली असू शकते.

डॉ. डी निकोलॅन्टोनियो यांच्या म्हणण्यानुसार, हार्ट अटॅक असलेल्या सुमारे निम्म्या लोकांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या दिसू शकते. काही प्रकरणांमध्ये हार्ट अटॅक लक्षणं दिसण्याच्या पाच वर्षांपर्यंत आधी ही समस्या सुरू होऊ शकते.

यामागे रक्तप्रवाह महत्त्वाची भूमिका बजावतो. शरीरातील लहान रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या, तर त्याचा परिणाम लैंगिक आरोग्यावरही होऊ शकतो. हाच रक्तवाहिन्यांशी संबंधित धोका हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्येही दिसू शकतो.

थोडं चालल्यावर धाप लागणं

जिना चढताना, थोडं चालताना किंवा हलकं व्यायाम करतानाच नेहमीपेक्षा जास्त दम लागतोय का? अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. ‘व्यायामाची सवय नाही’, ‘फिटनेस कमी झाला आहे’ किंवा ‘थकवा आहे’ असं म्हणून हा त्रास टाळला जातो. मात्र, डॉ. डी निकोलॅन्टोनियो यांच्या मते, हलका व्यायाम किंवा रोजच्या साध्या कामांदरम्यान होणारा असामान्य श्वास लागणे हा देखील महत्त्वाचा संकेत असू शकतो.

काही पायऱ्या चढल्यानंतर किंवा थोडं चालल्यानंतरच नेहमीपेक्षा जास्त धाप लागत असेल, तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यामागे हृदय शरीरातील रक्त योग्य प्रकारे पंप करू न शकणं किंवा फुफ्फुसांवर अतिरिक्त ताण येणं अशी कारणं असू शकतात.

पाय, घोटे किंवा पोटऱ्यांना सूज येणं

दिवसभर उभं राहिल्यानंतर किंवा बराच वेळ बसून राहिल्यानंतर पायांना सूज येणं अनेकांना सामान्य वाटतं. काही जण नवीन चप्पल किंवा शूज घट्ट असल्याचं कारण मानतात. लांबचा प्रवास केल्यानंतर आलेली सूजही अनेकदा दुर्लक्षित केली जाते. मात्र पाय, घोटे किंवा पोटऱ्यांना वारंवार किंवा सतत सूज येत असेल तर त्यामागे हृदयाशी संबंधित समस्या असू शकते.

डॉ. डी निकोलॅन्टोनियो यांच्या मते, पायांमध्ये द्रव साचल्यामुळे अशी सूज येऊ शकते. ही समस्या हृदय कमकुवत होण्याशी संबंधित असू शकते. त्याचबरोबर किडनीच्या कार्यातील समस्येमुळेही शरीरात द्रव साचू शकतो. हृदय शरीरात रक्त योग्य प्रकारे पंप करू शकत नसेल तर शरीराच्या खालच्या भागात द्रव जमा होऊ शकतो. त्यामुळे पाय आणि घोट्यांमध्ये सूज दिसू शकते.

हृदयाच्या या संकेतांकडे लक्ष देणं का गरजेचं?

हार्ट अटॅकची लक्षणं नेहमीच छातीत तीव्र वेदना अशा स्वरूपात समोर येतील असं नाही. काही वेळा शरीर आधीपासूनच छोटे संकेत देत असतं. हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगने 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका आढाव्यातही पायांना सूज येणं, थकवा आणि धाप लागणं यांचा हृदय कमकुवत होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला होता.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना जॅकपॉट लागण्याची शक्यता! ३.२५ फिटमेंट फॅक्टरची मागणी; Level-10 मुळे पगार किती वाढणार?

Gold price today : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! आज सोन्याच्या दरात वाढ; पाहा 24K, 22K आणि 18K चे ताजे भाव

Maharashtra News Live Update: मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या अवघा ५३.७० टक्के इतकाच पाऊस

९९८ कोटींचा खर्च अन् तब्बल ८.९ किमी लांबी! महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या फ्लायओव्हरचं आज उद्घाटन; काय आहे खास?

Weight Loss : पॉपकॉर्न की मखाने; वजन कमी करण्यासाठी कोणता स्नॅक्स आहे जास्त फायदेशीर?

SCROLL FOR NEXT