वयाची तिशी ओलांडल्यानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक बदल घडू लागतात. घर, नोकरी, मुलांची जबाबदारी आणि दैनंदिन धावपळ यामध्ये अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र वयाच्या ३० नंतर शरीरातील हार्मोन्स, चयापचय, मासिक पाळी आणि जीवनशैलीशी संबंधित बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते.चला तर जाणून घेऊया, वयाच्या ३० नंतर महिलांनी कोणत्या आजारांबाबत सतर्क राहावे आणि कोणत्या आरोग्य तपासण्या करून घ्याव्यात.
मधुमेह
वयाच्या ३० नंतर महिलांनी रक्तातील साखरेच्या पातळीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बैठी जीवनशैली, वजन वाढणे, आनुवंशिकता, गर्भावस्थेतील मधुमेहाचा पूर्वइतिहास आणि असंतुलित आहार यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब हा अनेकदा कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता शरीरावर परिणाम करू शकतो. वाढते वजन, मानसिक ताण, कमी शारीरिक हालचाल, जास्त मीठ खाणे आणि कौटुंबिक इतिहास यामुळे रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
थायरॉईडचे विकार
महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्या आढळू शकतात. थायरॉईड हार्मोन्समध्ये बदल झाल्यास वजन, मासिक पाळी, केस, त्वचा आणि शरीरातील ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो.
स्तनाचा कर्करोग
वय वाढत असताना स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. विशेषतः कुटुंबात आई, बहीण किंवा जवळच्या नातेवाइकांना स्तनाचा कर्करोग झालेला असल्यास अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.स्तनामध्ये गाठ जाणवणे. स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल होणे. स्तनाग्रातून रक्तमिश्रित स्त्राव येणे. स्तनाच्या त्वचेवर सुरकुत्या दिसणे, अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जा.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
महिलांनी वयाच्या ३० नंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत विशेष जागरूक राहणे आवश्यक आहे. HPV म्हणजेच Human Papillomavirus या विषाणूचा दीर्घकाळ संसर्ग राहिल्यास या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
रक्ताची कमतरता
महिलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमियाची समस्या दिसून येऊ शकते. विशेषतः मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होणे, आहारातून पुरेसे लोह न मिळणे, गर्भधारणा आणि काही पोषणविषयक कमतरता यामुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते.
PCOS आणि हार्मोनल असंतुलन
PCOS म्हणजेच Polycystic Ovary Syndrome ही महिलांमध्ये आढळणारी हार्मोनशी संबंधित समस्या आहे. याचा परिणाम मासिक पाळी, वजन, त्वचा आणि प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो. वयाच्या ३० नंतरही या समस्येची लक्षणे दिसू शकतात.
हृदयविकार - कोलेस्ट्रॉल
वयाच्या ३० नंतर महिलांनी हृदयाच्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, लठ्ठपणा आणि कौटुंबिक इतिहास यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास किंवा अचानक घाम येणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
किडनी- लिव्हरशी संबंधित समस्या
मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि काही औषधांचा दीर्घकाळ वापर यामुळे किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या अवयवांशी संबंधित समस्या सुरुवातीला स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत.
हाडांची घनता कमी होणे
महिलांच्या हाडांचे आरोग्यही वयानुसार बदलू शकते. विशेषतः रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढतो. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि काही औषधांचा दीर्घकालीन वापर यांचाही हाडांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
CBC - हिमोग्लोबिन आणि रक्ताची कमतरता
Blood Pressure - उच्च रक्तदाब
Lipid Profile - कोलेस्ट्रॉलची पातळी
TSH - थायरॉईडचे कार्य
FBS / HbA1c - मधुमेहाची तपासणी
Vitamin B12 / D - जीवनसत्त्वांची कमतरता
KFT - किडनीचे कार्य
LFT - लिव्हरचे कार्य
Clinical Breast Examination - स्तनातील गाठी किंवा बदल
Pap Smear / HPV Test - गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, दूध, डाळी आणि प्रथिनांचा समावेश करा.
दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योगासने किंवा इतर शारीरिक हालचाली करा.
दररोज ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढा. ध्यान, योग आणि आवडीच्या गोष्टींसाठी वेळ द्या.
नियमित व्यायाम आणि योग्य आहाराच्या मदतीने निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करा.
कोणतीही लक्षणे नसली तरी वयानुसार आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक तपासण्यांबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.