तुमचं वय काय आहे? जर आम्ही हा प्रश्न विचारला, तर तुम्ही बहुधा उत्तर द्याल, "मी ३० किंवा ४० वर्षांचा आहे." पण जर मी विचारलं, "तुमच्या हृदयाचं वय काय आहे?" आणि जर आम्ही म्हटलं, "तुम्ही ४० वर्षांचे असूनही तुमच्या हृदयाचं वय ६० आहे?" तर? हे थोडं विचित्र वाटू शकतं. पण आजकाल अनेक रुग्ण याच समस्येचा सामना करत आहेत. चुकीची जीवनशैली, तणाव, अयोग्य खाण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तुमचं हृदय अकाली म्हातारं होतंय.
तुमची जन्मतारीख केवळ महत्त्वाची नाही, तर तुमचं हृदय किती वयस्कर वाटतं यासाठीही ती अत्यंत महत्त्वाची आहे. वैद्यकीय भाषेत याला heart age म्हणतात. ज्यावेळी आपण हृदयाच्या वयाबद्दल बोलतो, तेव्हा ते हृदयाच्या आरोग्याशी संबंधित असतं. कधीकधी एखादी व्यक्ती ४० वर्षांची असते. परंतु तिच्या धमन्या, रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्याच्या आधारावर तिचं हृदय ५५ किंवा ६० वर्षांच्या व्यक्तीप्रमाणे असतं. हृदयाचं वय तुम्हाला सांगतं की, भविष्यात तुम्हाला हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा इतर हृदयाच्या आजारांचा किती धोका आहे.
जर तुमचा रक्तदाब नियंत्रणात नसेल, तर हृदयाला जास्त काम करावं लागू शकतं. यामुळे हृदयावर दबाव येतो आणि कालांतराने त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
जर तुमच्या रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल, तर धमन्यांमध्ये चरबी जमा होऊ लागते. याचा रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
सिगारेट आणि तंबाखू रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांचं हृदय इतरांपेक्षा जास्त वृद्ध असू शकतं.
आजकाल बहुतेक लोक ऑफिसमध्ये फक्त बसून काम करतात आणि कमी हालचाल करतात. हे देखील त्यांच्या हृदयाचं वय वाढण्याचं एक प्रमुख कारण असू शकतं.
जास्त वजन आणि रक्तातील साखरेच्या पातळीतील चढ-उतार हे हृदयासाठी सर्वात मोठे धोक्याचे घटक मानले जातात.
विशेष म्हणजे, काहीवेळा रुग्णांमध्ये कोणतीही मोठी लक्षणं दिसत नाहीत. अशावेळी काही लक्षणं आहेत ज्यांकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणं म्हणजे छोट्या कामाने धाप लागणं, थकवा, पायऱ्या चढण्यास अडचण, रक्तदाब वारंवार वाढणं, सतत वजन वाढणं आणि छातीत जडपणा जाणवणं. यापैकी कोणतंही लक्षण दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
पूर्वी हार्ट अटॅक हा केवळ वृद्ध व्यक्तींचा आजार मानला जात होता. पण आता तरुणांमध्ये या समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. रात्री उशिरापर्यंत जागणं, तणाव, फास्ट फूड आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही त्याची प्रमुख कारणं आहेत. यामुळे अनेक निरोगी दिसणाऱ्या तरुणांना हार्ट अटॅकचा धोका असतो.
निरोगी सवयींद्वारे तुम्ही तुमचं हृदय म्हातारं होण्यापासून रोखू शकता. दररोज किमान ३० मिनिटं चालणं हा तुमचं हृदय मजबूत करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. याव्यतिरिक्त, तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि प्रोटीन यांचा समावेश करून निरोगी आहार घ्या.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.