Surabhi Jayashree Jagdish
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक तरुण काम आणि सोशल मीडियामुळे झोप कमी घेतात. अशावेळी काहींना झोपेचा त्याग करावा लागतो. ज्याचा परिणाम शरीर आणि हृदयावर गंभीररित्या होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते प्रौढ व्यक्तींना दररोज किमान सात तास झोप आवश्यक असते. मात्र अनेक लोक फक्त पाच ते सहा तासच झोप घेतात. ही सवय दीर्घकाळात आरोग्यासाठी हानिकारक ठरते.
झोपेअभावी मन अस्वस्थ राहू शकतं आणि मूड सतत बदलतो. यामुळे चिंता, डिप्रेशन आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होतात. विचार स्पष्ट न होणं आणि स्मरणशक्ती कमी होण्याची समस्याही जाणवते.
पुरेशी झोप न घेतल्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. यामुळे टाइप-2 डायबिटीज, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचा धोका वाढतो. शरीरातील मेटाबॉलिझमही बिघडू शकतो.
झोप पूर्ण न झाल्यामुळे सतत थकवा आणि गुंगी जाणवते. अशावेळी गाडी चालवताना लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते. कामाच्या ठिकाणीही दुखापतीचा धोका अधिक असतो.
कमी झोपेमुळे एकाग्रता कमी होते आणि मेंदू मंदावल्यासारखा वाटतो. स्मरणशक्तीवरही त्याचा वाईट परिणाम होतो. दिवसभर रिकामेपणा आणि सुस्ती जाणवू शकते.
डॉक्टरांच्या मते डोळ्यांखाली डार्क सर्कल दिसणं हे झोपेच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. डोळे सुजलेले दिसणं आणि चेहरा थकलेला वाटणंही सामान्य आहे. म्हणून चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे.