Raksha Bandhan 2026 saam tv
लाईफस्टाईल

Raksha Bandhan 2026: लग्न झाल्यानंतर भाऊ-बहिणीच्या नात्यात अचानक दुरावा का निर्माण होतो? यामागची खरी कारणं जाणून घ्या

Sibling relationship: लग्नानंतर नवीन नाती, जबाबदाऱ्या, नोकरी आणि कुटुंबामुळे भाऊ-बहिणींमधील संवाद कमी होऊ शकतो. मात्र याचा अर्थ प्रेम कमी झालं असा नाही. गैरसमज, आर्थिक किंवा प्रॉपर्टीचे प्रश्न आणि जोडीदाराच्या विचारांचा परिणामही नात्यावर होऊ शकतो. हे नातं टिकवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

लग्न झाल्यानंतर फक्त घर बदलत नाही तर आयुष्याची घडीही पूर्णपणे बदलते. नवीन घर, नवीन नाती, नव्या जबाबदाऱ्या, नोकरी आणि मुलांची काळजी या सगळ्यांमध्ये पूर्वीसारखा मोकळा वेळ मिळणं कठीण होतं. त्यामुळे भाऊ-बहिणीचं बोलणं कमी झालं, भेटीगाठी कमी झाल्या तर त्याचा अर्थ त्यांच्या मनातलं प्रेम कमी झालं असं अजिबात नाही. अनेकदा मनात खूप काही असतं, एकमेकांना फोन करावासा वाटतो पण कामाच्या गडबडीत दिवस कधी संपतो हेच कळत नाही.

बहिणीला वाटतं भाऊ पूर्वीसारखा राहिलेला नाही

लग्नानंतर बहीण जेव्हा माहेरापासून दूर जाते तेव्हा तिला घरातल्या अनेक गोष्टींची आठवण येते. त्यातही बालपणाच्या असंख्य आठवणी ज्या भावासोबत जोडलेल्या असतात त्या तिला जास्त आठवतात. त्यामुळे भाऊ पूर्वीसारखा फोन करत नसेल किंवा तो स्वतःच्या आयुष्यात जास्त व्यस्त असेल, तर बहिणीच्या मनात सहज विचार येऊ शकतो की, ‘आता त्याला माझी पूर्वीसारखी काळजी नाही.’

पण दुसरीकडे भावाचाही वेगळा विचार असू शकतो. बहिण आपल्या नवीन कुटुंबात आनंदी असेल तिच्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या असतील, त्यामुळे तिला वारंवार फोन करून त्रास देऊ नये, असं त्याला वाटतं. दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम असतं, मात्र एकमेकांशी न बोलल्यामुळे दोघंही आपल्या मनाने काहीतरी वेगळाच अर्थ काढतात.

लग्नानंतर आलेल्या नव्या नात्यांचाही परिणाम होतो

भाऊ-बहिणीमध्ये दुरावा निर्माण होण्यामागे नेहमीच कामाचा व्याप किंवा वेळेची कमतरता असते असं नाही. भाऊ किंवा बहिणीच्या जोडीदाराची विचारसरणीही या नात्यावर परिणाम करू शकते. एखाद्या व्यक्तीला आपल्या जोडीदाराचं भावाला किंवा बहिणीला जास्त महत्त्व देणं खटकत असेल तर अगदी छोट्या गोष्टीचाही वाद होऊ शकतो.

अशा प्रसंगांनंतर भाऊ-बहिणींमधील बोलणं हळूहळू कमी होऊ लागतं. पूर्वी एकमेकांशी बोलताना कशाचाही विचार करावा लागत नव्हता. मनात आलं ते सहज सांगता येत होतं. पण लग्नानंतर परिस्थिती बदलते आणि एखादी गोष्ट बोलण्यापूर्वीही अनेकदा विचार करावा लागतो.

पैसा आणि पॉपर्टीचे प्रश्न

काही कुटुंबांमध्ये भाऊ-बहिणींमधील दुराव्याची सुरुवात अगदी छोट्या आर्थिक कारणातून होते. आई-वडिलांची मालमत्ता, पैशांची मदत किंवा कुटुंबातील जबाबदाऱ्या कोण किती घ्यायच्या, यावरून मतभेद होऊ शकतात.

समस्या तेव्हा वाढते ज्यावेळी नाराजी थेट बोलून दाखवण्याऐवजी मनातच ठेवली जाते. एका बाजूला ‘माझ्याबरोबर चुकीचं झालं’ अशी भावना तयार होते तर दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीला आपला भाऊ किंवा बहीण नेमका कशामुळे नाराज आहे हेही समजत नाही. त्यामुळे गैरसमज वाढत जातात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो.

नात्यातील दुराव्याचं खरं कारण

भाऊ-बहिणीचं नातं एका दिवसात बदलत नाही. हा दुरावा अनेकदा हळूहळू तयार होतो. एक फोन राहून जातो, मग दुसरा फोनही केला जात नाही. एखाद्या सणाला भेट होत नाही. एखाद्या गोष्टीचा मनाला राग येतो, पण तो समोरच्या व्यक्तीला सांगितला जात नाही. अशा छोट्या-छोट्या गोष्टी मनात साठत जातात.

काही काळानंतर लक्षात येतं की, ज्या भावाशी किंवा बहिणीशी पूर्वी तासन्तास गप्पा मारल्या जायच्या, त्याच्याशी किंवा तिच्याशी आता बोलण्यासाठीही एखादं कारण शोधावं लागतं. नातं संपलेलं नसतं, प्रेमही कमी झालेलं नसतं, फक्त संवाद कमी झालेला असतो.

हे नातं टिकवण्यासाठी फार मोठी गोष्ट करण्याची गरज नाही

भाऊ-बहिणीचं नातं लहानपणापासून तयार झालेलं असतं. त्यामुळे ते टिकवण्यासाठी खूप मोठ्या प्रयत्नांची गरज नसते. रोज फोन करणं किंवा दररोज बोलणंही आवश्यक नाही. पण अधूनमधून अचानक फोन करून ‘कसा आहेस?’, ‘कशी आहेस?’ एवढं विचारणंही खूप महत्त्वाचं असतं.

सणाच्या दिवशी भेटणं, एखादा खास दिवस एकत्र साजरा करणं किंवा निवांत बसून बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा देणं, एवढ्यानेही नात्यातली जवळीक पुन्हा जाणवू शकते. कारण आयुष्य कितीही बदललं, कितीही जबाबदाऱ्या वाढल्या तरी भाऊ-बहिणीचं नातं टिकवण्यासाठी फक्त थोड्या वेळाची, थोड्या संवादाची आणि एकमेकांची आठवण ठेवण्याची गरज असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : लासलगाव रेल्वे स्थानकातून ' कांदा एक्सप्रेस ' आज रवाना होणार

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा सोनं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा भाव

Housing Society : सोसायटीने गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी सक्ती केली? आताच जाणून घ्या तुमचे कायदेशीर अधिकार

Egg : कच्चं की उकडलेलं अंडं; जास्त प्रोटीन कशात, आरोग्यासाठी काय सुपरहेल्दी?

Hospital Fire : रुग्णलयात अग्नितांडव! १५ नवजात बाळांचा मृत्यू; परिसरात शोककळा

SCROLL FOR NEXT