Surabhi Jayashree Jagdish
हे लाडू बनवण्यासाठी अर्धा छोटा कप अक्रोड, अर्धा छोटा कप काजू आणि अर्धा छोटा कप बदाम घ्या. यासोबत दोन मोठे चमचे भोपळ्याच्या बिया, दोन छोटे चमचे तीळ आणि अर्धा छोटा कप किसलेलं सुकं खोबरं लागेल. लाडूंना गोडवा आणि बांधणी मिळण्यासाठी पावणेदोन कप नव्हे, तर पावणेकप मऊ खजूर आणि चव वाढवण्यासाठी पाव छोटा चमचा वेलची पावडर घ्या.
लाडू बनवण्याची सुरुवात मेवा भाजण्यापासून करा. यासाठी आधी पॅन गरम करून त्यात काजू, बदाम आणि इतर मेवा मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. मेवा भाजताना आवडीनुसार थोडं तूपही वापरता येतं.
मेवा भाजून झाल्यानंतर तो बाजूला काढा आणि त्याचप्रमाणे भोपळ्याच्या बिया आणि तीळही हलके भाजून घ्या. बिया भाजताना त्या जास्त करपणार नाहीत याची काळजी घ्या. मेवा आणि बिया भाजून झाल्यानंतर त्यांना थोडं थंड होऊ द्या.
आता भाजलेला काजू, बदाम आणि इतर मेवा ब्लेंडरमध्ये घाला. त्याची बारीक पावडर करून घ्या, मात्र ती अगदी पेस्ट होणार नाही याची काळजी घ्या. मेव्याची पावडर तयार झाल्यानंतर त्यात भाजलेल्या बियांचा वापर पुढील मिश्रणासाठी केला जाईल.
यानंतर मऊ खजूर काही वेळ कोमट पाण्यात भिजत ठेवा. खजूर चांगले फुलल्यानंतर त्यातील बिया काढून टाका आणि खजूर मिक्सरमध्ये फिरवून त्याची घट्ट प्युरी तयार करा. ही प्युरी लाडूंना गोडवा देण्यासोबतच मेवा आणि बियांचं मिश्रण एकत्र बांधण्याचं काम करेल.
आता एका मोठ्या भांड्यात तयार केलेली खजुराची प्युरी घ्या आणि त्यात मेवा व बियांची पावडर घाला. त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं आणि वेलची पावडर घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत चांगलं मिसळा. मिश्रण तयार झाल्यावर हाताने त्याचे छोटे-छोटे गोळे घेऊन त्यांना लाडूचा आकार द्या.
लाडू तयार झाल्यानंतर ते अधिक सुंदर दिसावेत यासाठी त्यांना गुलाबाच्या पाकळ्या, पिस्त्याची पावडर किंवा खोबऱ्याच्या पावडरीत घोळवता येतं. अक्रोड वापरताना आधी त्याची चव तपासून घ्या. कारण काही वेळा अक्रोड कडवट लागल्यास संपूर्ण लाडूची चव बिघडू शकते.