भारतातील शहरी भागातील तरुण, नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन (यूटीआय) आणि योनिमार्गाच्या इन्फेक्शनचं प्रमाण वाढताना दिसतंय. या समस्या आता महिलांना एकदाच होत नसून अनेक महिलांना वर्षातून तीन ते चार वेळा या यांचा सामना करावा लागतो. डॉक्टरांच्या मते, जगात यूटीआयची सर्वाधिक समस्या भारतात होताना दिसतेय. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा संसर्ग होण्यामागे बहुतांशी सुशिक्षित महिलांचा समावेश आहे.
शहरी जीवनशैलीमुळे महिलांना ऑफिसमध्ये बराच वेळ काम करावं लागतं. अनेकदा स्वच्छ शौचालयांच्या अभावामुळे त्या बराच वेळ लघवी रोखून धरतात. डॉक्टरांच्या मते, लघवी रोखून धरल्यामुळे किडनीत बॅक्टेरियांची वाढ होते ज्यामुळे इन्फेक्शन होतं. इतकेच नाही तर चुकीच्या पद्धतीने स्वच्छता करणं किंवा केमिकल्स, सुगंधी प्रोडक्ट्स वापरणं यांसारख्या पर्सनल हायजीनमधील चुकांमुळे योनीतील नैसर्गिक बॅक्टेरिया म्हणजेच चांगले जीवाणू नष्ट होऊ शकतात. यामुळे महिलांना इन्फेक्शनचा धोका दुप्पट होतो.
जेव्हा महिलांना लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात त्यावेळी त्या डॉक्टरांकडे जाण्याऐवजी मेडिकल स्टोअरमधून अँटीबायोटिक्स विकत घेऊन स्वतःच त्यांचं सेवन करतात. थोडा आराम मिळताच त्या औषधोपचाराचा कोर्स सोडून देतात. अनेकदा आपल्याला कळत नाही मात्र ही सवय आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असते.
औषधोपचाराचा कोर्स अपूर्ण सोडल्यामुळे बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होत नाहीत आणि शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोध निर्माण होतो. याचा अर्थ असा की, पुढच्या वेळी औषध घेतल्यावर इन्फेक्शन परत येतं आणि औषध काम करणं थांबवतं.
फॅशन आणि कपड्यांची निवड देखील या आजाराला कारणीभूत ठरतंय. सतत घट्ट सिंथेटिक कपडे किंवा जीन्स घातल्याने प्रायव्हेट पार्टना हवेचं सर्कुलेशन थांबतं ज्यामुळे ओलावा वाढतो. हा ओलावा बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी पोषक वातावरण ठरतो. ऑफिसमध्ये आणि घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना बऱ्याच प्रमाणात ताण-तणावाचा सामना करावा लागतो. अतिरिक्त तणावामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते ज्यामुळे इन्फेक्शनशी लढण्याची शक्यता कमी होते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.