Surabhi Jayashree Jagdish
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही लोकांमध्ये काही दिवस किंवा काही आठवडे आधीच शरीर इशारे देऊ लागतं. मात्र ही लक्षणे प्रत्येक व्यक्तीत सारखीच दिसतील याची हमी नसते. हार्ट अटॅक येण्याच्या १५ दिवस अगोदर कोणती लक्षणं दिसतात ते पाहूयात.
हार्ट अटॅकच्या काही दिवस किंवा आठवडे आधी छातीत दडपण, जळजळ किंवा जडपणा जाणवू शकतो. ही अस्वस्थता चालताना, जिने चढताना किंवा शारीरिक श्रम करताना वाढू शकते. हा त्रास वारंवार होत असल्यास तो गंभीर इशारा असू शकतो.
नेहमीपेक्षा कमी काम केल्यावरही छातीत अशा वेदना होत असतील तर सावध व्हा. हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण होते.
अचानक आणि कारण नसताना सतत थकवा जाणवणं हे दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे. पुरेशी झोप घेतल्यानंतरही शरीरात ऊर्जा नसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः महिलांमध्ये हे लक्षण हार्ट अटॅक येण्याच्या जवळपास १५ दिवस अगोदर दिसून येऊ शकतं.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थ साचल्यामुळे अडथळा निर्माण होतो. हा अडथळा अचानक वाढल्यास हृदयाच्या स्नायूंना रक्त मिळत नाही आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.
नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य वजन राखणं हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर पूर्णपणे टाळणं आवश्यक आहे. रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल नियमित तपासल्याने धोका कमी करता येतो.
दीर्घकाळ तणावात राहिल्याने हृदयावर अतिरिक्त ताण येतो. योग, ध्यान आणि पुरेशी झोप यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तसंच हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असल्यास नियमित डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.