How to control diabetes naturally : सध्याच्या काळात अनेकजण डायबिटीजसारख्या आजाराने त्रस्त आहेत. आपल्या आजूबाजूला एकतरी व्यक्ती डायबिटीज झालेला आढळतोच. अनेकांना तर ३० अथवा ४० वर्षानंतर डायबिटीज आजार होतो. जवळपास प्रत्येक घरात एकतरी व्यक्ती डायबिटीज असलेला आढळतोच. पण डायबिटीज झाला म्हणजे आयुष्य संपलं असे होत नाही. डायबिटीजमध्ये योग्य ती काळजी घेतली तर माणूस १०० वर्षेही जगेल. त्यासाठी ABCD हा फॉर्म्युला तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलाय.
प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्ही. मोहन यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या विशेष लेखात डायबिटीजच्या रूग्णांसाठी'ABCD' हा सोपा फॉर्म्युला सांगितला, हा फॉर्म्युला प्रत्येक रुग्णाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने मधुमेही रुग्णही अगदी १०० वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगू शकतात.
नेमका काय आहे हा 'ABCD' मंत्र?
डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी प्रत्येक रुग्णानं जेवणापासून ते व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच. प्रत्येक २ ते ३ महिन्यांनंतर डायबिटीजची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय एबीसीडी फॉर्म्युलाही सांगितला आहे. पाहूयात नेमकं काय आहे?
A (A1c): रक्तातील ३ महिन्यांची सरासरी साखर (HbA1c) ७ टक्क्यांपेक्षा कमी असावी.
B (Blood Pressure): रक्तदाब (BP) नियंत्रणात ठेवावा. तो १३०/८० पर्यंत असणे सर्वात उत्तम.
C (Cholesterol): शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) १०० पेक्षा कमी आणि भारतीयांसाठी ते ५० ते ७० च्या दरम्यान असावे.
D (Discipline): सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिस्त असायला हवं. त्यामध्ये सकस आहार, रोजचा व्यायाम, पुरेशी झोप, नियमित तपासणी आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे याचा समावेश होतो. तसेच धूम्रपान पूर्णपणे टाळावे.
डायबिटीजची तपासणी कधी करावी? :
भारतीयांना कमी वयात आणि सडपातळ बांधा असूनही डायबिटीज होण्याचा धोका असतो. त्यामुळे वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर प्रत्येकाने डायबिटीजची टेस्ट करावीच. जर घरात आधी कोणाला मधुमेह असेल तर वयाच्या २० व्या वर्षापासूनच तपासणी सुरू करावी. जेणेकरून डायबिटीज असल्याचे समजल्यास लवकर उपाययोजना करता येतील.
डायबिटीज असणाऱ्यांनी काय खावं?
आपल्या जेवणात भात, चपातीचे (कार्बोहायड्रेट्स) प्रमाण जास्त असते. पण डायबिटीज असणाऱ्यांनी चपाती कमी प्रमाणात खावी. डायबिटीज असणाऱ्यांच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचं प्रमाण वाढवावे. तसेच तसेच प्रोटीनही जेवणात (डाळी, कडधान्ये, पनीर, दूध) असावे.
व्यायाम :
डायबिटीज असणाऱ्यांनी दिवसात किमान ४५ मिनिटे ते १ तास चालावे. अनेकांना वाटते की औषधे घेतल्याने नुकसान होते, पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नयोत. डायबिटीजची टेस्ट स्वत:हून बंद केली तर ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डायबिटीजच्या रूग्णांनी काहीही बंद करू नये.
प्रदूषणाचाही धोका :
हवेतील अतिसूक्ष्म धूलिकण (PM2.5) फुफ्फुसांद्वारे रक्तात मिसळून इन्सुलिनवर परिणाम करतात. त्यामुळेही मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे फक्त आनुवंशिकतेमुळेच डायबिटीज होतो असे नाही. तर आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केला, तरी डायबिटीजला सहज टाळता येईल अथवा त्याच्यासोबत १०० वर्षे जगता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.