आपल्या शरीरातील लिव्हर म्हणजे एक प्रकारचा ‘फिल्टर’च आहे. शरीरासाठी ते दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचं सातही दिवस सतत काम करत असतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणं, अन्न पचवण्याच्या प्रक्रियेत मदत करणं आणि शरीरासाठी आवश्यक ऊर्जा साठवून ठेवणं अशी अनेक महत्त्वाची कामं लिव्हर करतं.
मात्र सध्याची धावपळीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी याचा थेट परिणाम लिव्हरच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे फॅटी लिव्हरसह लिव्हरशी संबंधित इतर समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत.
लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलेल्या डाएट प्लॅननुसार, दिवसभराच्या आहारात काही साध्या गोष्टींचा समावेश करून लिव्हरच्या आरोग्याची काळजी घेता येऊ शकते.
दिवसाची सुरुवात हेल्दी ड्रिंकने करणं फायदेशीर ठरू शकते. डॉक्टर सलीम जैदी यांच्या मते, ब्लॅक कॉफी लिव्हरसाठी फायदेशीर ठरते. सकाळी दूध आणि साखर न घालता एक कप ब्लॅक कॉफी घेऊ शकता. यामुळे लिव्हरच्या आरोग्याला फायदा होण्यास मदत होते.
यानंतर नाश्त्यामध्ये शरीराला पोषण देणारे पदार्थ घ्या. यासाठी मूठभर अक्रोड खाऊ शकता. अक्रोडामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक लिव्हरमधील सूज कमी करण्यास मदत करू शकतात. अक्रोडासोबत ओट्स किंवा पोहे यांसारखे हलके आणि फायबर भरपूर असलेले पदार्थ नाश्त्यात घेणेही चांगले ठरू शकते.
दुपारच्या जेवणात लिव्हरसाठी उपयुक्त ठरतील अशा भाज्या आणि बियांचा समावेश करा. यावेळी सलाडमध्ये बीटचा समावेश करणं फायदेशीर मानलं जातं. बीटचं सलाड किंवा त्याचा ज्यूस लिव्हरचं काम सुरळीत होण्यास आणि त्याची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकतो.
तसंच व्हिटॅमिन सी भरपूर असलेला आवळाही आहारात जरूर घ्या. दुपारच्या जेवणासोबत आवळ्याचा ज्यूस किंवा एक कच्चा आवळा खाऊ शकता. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तुमच्या जेवणावर किंवा सलाडवर एक चमचा भाजलेल्या जवसाच्या बिया टाकू शकता. जवसाच्या बियांमध्ये असलेले पोषक घटक फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी मदत करू शकतात.
संध्याकाळी भूक लागली की लगेच चिप्स, तळलेले पदार्थ किंवा इतर अनहेल्दी स्नॅक्स खाण्याऐवजी ग्रीन टी किंवा थोडे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. रात्रीचं जेवण शक्यतो हलकं आणि सहज पचणारं असावं. रात्रीच्या आहारात जड, तेलकट आणि जंक फूड टाळणं महत्त्वाचं आहे.
रात्रीच्या जेवणात किंवा झोपण्यापूर्वी हळदीचे सेवनही फायदेशीर ठरू शकतं. हळदीमध्ये ‘कर्क्युमिन’ नावाचा घटक असतो. हा घटक लिव्हरच्या पेशींना होणारं नुकसान कमी करण्यास आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतो. हळद घ्यायची असल्यास चिमूटभर हळद कोमट पाण्यात मिसळून घेऊ शकता.
रात्रीच्या जेवणासाठी हिरव्या पालेभाज्या, डाळ आणि पोळी किंवा पातळ खिचडीसारखे हलके पदार्थ निवडा. रात्री जास्त तेलकट पदार्थ किंवा जंक फूड खाणं टाळा. अशा पदार्थांमुळे लिव्हरवर अतिरिक्त ताण पडू शकतो. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी केवळ एखादा एक पदार्थ खाण्यापेक्षा संपूर्ण आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.