

आजकाल हाय कोलेस्ट्रॉलची समस्या केवळ ज्येष्ठांपुरती मर्यादित राहिलेली नाही. बदललेली जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्येही कोलेस्ट्रॉल वाढण्याचे प्रमाण दिसून येतंय. कोलेस्ट्रॉल वाढलं की अनेक आजारांचा धोका वाढतो.
कोलेस्ट्रॉल वाढलं आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. विशेषतः LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात जास्त झालं तर रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमा होण्याचा धोका वाढतो. यामुळे पुढे हार्ट अटॅक, स्ट्रोक, रक्तदाब आणि एथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच रक्तवाहिन्या अरुंद किंवा कडक होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
मात्र कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणून घाबरण्याची गरज नाही. आहारात काही छोटे बदल, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. यासाठी रोजच्या आहारातील काही पदार्थांचं प्रमाण कमी करणं महत्त्वाचं आहे. हे पदार्थ कोणते आहेत ते पाहूयात.
दूध, पनीर, बटर यांसारख्या डेअरी पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं. याचं प्रमाण जास्त झाल्यास रक्तातील LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. विशेषतः बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं. एका छोट्या चमचा बटरमध्ये सुमारे ७.३ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असू शकते. साधारण २,००० कॅलरींचा आहार घेणाऱ्या व्यक्तीने दिवसाला सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण साधारण ११ ते १३ ग्रॅमच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी ठेवणं योग्य मानलं जातं.
बटरचा वापर फक्त ब्रेडवर लावण्यासाठीच होत नाही. अनेक बेकरी पदार्थ, केक, पेस्ट्री आणि इतर जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांमध्येही बटर किंवा सॅच्युरेटेड फॅट असू शकतं. याशिवाय दूध किंवा दही यांचं सेवन करताना कमी फॅटचे पर्याय निवडा.
कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर रेड मीटचं सेवन कमी करणं फायदेशीर ठरू शकतं. जास्त चरबी असलेले मांस वारंवार खाल्ल्यास आहारातील सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण वाढू शकतं. यासोबतच बेकन, सॉसेज यांसारखे प्रोसेस्ड मीट शक्य तितकं कमी खाणं चांगलं असतं. अशा पदार्थांच्या वारंवार सेवनाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि काही प्रोसेस्ड मीट पदार्थांचा कॅन्सरच्या वाढलेल्या जोखमीशी संबंध आढळतो.
फक्त कोणतं मांस खाता हेच महत्त्वाचं नाही तर ते कशा पद्धतीने शिजवता हेही महत्त्वाचं आहे. मांस अतिशय जास्त तापमानावर ग्रिल किंवा फ्राय केल्यास काही हानिकारक रसायनं तयार होऊ शकतात. मांस खायचं असल्यास ते उकडणं, वाफवणे किंवा कमी आचेवर व्यवस्थित शिजवणं हे तुलनेने योग्य ठरतं.
फ्रेंच फ्राइज, फ्राइड चिकन, समोसे, भजी किंवा इतर डीप फ्राय केलेले स्नॅक्स तोंडाला चविष्ट वाटत असले तरी त्यामध्ये कॅलरी आणि अयोग्य फॅट्सचं प्रमाण जास्त असू शकतं. ट्रान्स फॅट असलेले पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणं महत्त्वाचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.