कार्डियाक अरेस्ट हृदयाची गती थांबण्याचा प्राणघातक प्रकार आहे.
पुरुषांमध्ये छातीत दुखणं, स्त्रियांमध्ये श्वास घेण्यास त्रास हे प्रमुख लक्षण आहे.
हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट दोन वेगळे आजार आहेत.
हृदयविकार हा जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण मानला जातो. दरवर्षी लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या या आजारातील सर्वात धोकादायक रूप म्हणजे कार्डियाक अरेस्ट म्हणजेच अचानक हृदयाची गती थांबणं. योग्य वेळी उपचार न झाल्यास हा प्रकार प्राणघातक ठरतो. मात्र अलीकडील संशोधनात एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. कार्डियाक अरेस्टची पूर्वलक्षणं पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असतात.
हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हृदयविकाराचा झटका धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने होतो तर कार्डियाक अरेस्ट हा हृदयातील विद्युत प्रवाहाच्या बिघाडामुळे होतो. अचानक हृदय धडधडणं थांबतं, रक्तप्रवाह थांबतो आणि काही सेकंदांतच रुग्ण बेशुद्ध होतो. त्वरित सीपीआर (CPR) किंवा डीफिब्रिलेटर न वापरल्यास काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो.
‘द लॅन्सेट डिजिटल हेल्थ’ मध्ये प्रकाशित ताज्या अभ्यासात स्त्री-पुरुषांमधील लक्षणांमध्ये मोठा फरक असल्याचे स्पष्ट झाले.
पुरुषांमध्ये कार्डियाक अरेस्टपूर्वी सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणं.
स्त्रियांमध्ये हे लक्षण फारसं दिसून न येता त्याऐवजी श्वास घेण्यास त्रास हा सर्वाधिक जाणवणारा संकेत होता.
कॅलिफोर्नियातील PRESTO आणि ओरेगॉनमधील SUDS या अभ्यासातून मिळालेल्या आकडेवारीनुसार कार्डियाक अरेस्टच्या अगोदरच्या २४ तासांत जवळपास अर्ध्या रुग्णांना काहीतरी इशारा मिळाला होता. काहींना धडधड, फ्लूसारखी लक्षणं, चक्कर येणं किंवा अगदी आकडी (seizure) देखील आली होती.
संशोधनाचे प्रमुख डॉ. सुमित चुग यांनी सांगितलं, “ही लक्षणं ओळखली गेली तर तातडीने मदत मिळू शकते आणि मृत्यूदर कमी होऊ शकतो.”
हृदयविकाराचा झटका व कार्डियाक अरेस्ट यामधील फरक
बर्याचदा हे दोन्ही शब्द एकसारखे वापरले जातात पण प्रत्यक्षात ते दोन वेगळ्या आपत्कालीन परिस्थिती आहेत.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येऊन हृदयाचे स्नायू नुकसानग्रस्त होतात.
हृदयाच्या विद्युत प्रणालीतील बिघाडामुळे हृदयाची गती थांबते.
हृदयविकाराचा झटका झाल्यावर काहीवेळा कार्डियाक अरेस्ट उद्भवू शकतो, पण प्रत्येक वेळी तसे होत नाही. इतर कारणांमध्ये हृदयाचे ठोके बिघडणे (arrhythmia), हृदयाचा आकार वाढणे (cardiomyopathy), जास्त रक्तस्राव, झडपांचे आजार किंवा इलेक्ट्रोलाइट्समध्ये असंतुलन यांचा समावेश होतो.
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये अचानक कार्डियाक अरेस्टची प्रकरणे वाढत असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यामागे अनेक कारणे आहेत –
जीन्स व जीवनशैली : धूम्रपान, व्यायामाचा अभाव, चुकीचे खाणे-पिणे आणि ताण.
स्टेरॉइडचा गैरवापर : जिममध्ये जाणारे काही तरुण स्नायू वाढवण्यासाठी स्टेरॉइड्स घेतात, ज्यामुळे हृदयावर ताण येतो.
न ओळखलेले आजार : काही जणांना हृदयाशी संबंधित जन्मजात किंवा लपलेले आजार असतात, जे उशिरा समोर येतात.
मानसिक ताण : क्वचित प्रसंगी धक्का किंवा आघातामुळेही हृदय थांबू शकते.
कार्डियाक अरेस्टपूर्वी काही संकेत शरीर देते. विशेषतः महिलांमध्ये ही लक्षणे ताण किंवा चिंतेसारखी वाटून दुर्लक्ष केली जातात.
छातीत वेदना किंवा दडपण
श्वास घेण्यास त्रास
हृदयाचे ठोके वाढणे किंवा अनियमित धडधड
चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे
अतिशय थकवा
मळमळ किंवा पोटदुखी
घाम येणे किंवा डोकं हलकं होणे
कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?
हृदयाच्या विद्युत प्रणालीतील बिघाडामुळे हृदयाची गती अचानक थांबणे म्हणजे कार्डियाक अरेस्ट.
पुरुष आणि स्त्रियांमध्ये कार्डियाक अरेस्टची लक्षणे कशी वेगळी आहेत?
पुरुषांना छातीत दुखणे, स्त्रियांना श्वास घेण्यास त्रास जास्त जाणवतो.
हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक आहे?
झटका रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे, अरेस्ट विद्युत बिघाडामुळे होतो.
तरुणांमध्ये कार्डियाक अरेस्टचा धोका का वाढतो आहे?
स्टेरॉइड्सचा गैरवापर, ताण, अनियमित जीवनशैलीमुळे धोका वाढतो.
कार्डियाक अरेस्टपूर्वीची प्रमुख लक्षणे कोणती?
छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे, अतिथकवा आणि घाम येणे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.