ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं की अनेक महिलांच्या मनात सर्वात आधी स्तनातील गाठीचा विचार येतो. स्तनात गाठ जाणवली किंवा वेदना होऊ लागल्या तरच कॅन्सर असू शकतो असं अनेकांना वाटतं. पण प्रत्येक वेळी ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात गाठ किंवा वेदनांनीच होते असं नाही. काही वेळा स्तनाच्या त्वचेत, निपलमध्ये किंवा स्तनाच्या आकारात होणारे छोटे बदलही या आजाराची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.
त्यामुळे शरीरात होणारे बदल ओळखणं आणि वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. ब्रेस्ट कॅन्सरची कोणती लक्षणं महिलांनी लक्षात ठेवायला हवीत, याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिलीये.
स्तनात किंवा काखेत नवीन गाठ जाणवणं हे ब्रेस्ट कॅन्सरचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. ही गाठ आजूबाजूच्या भागापेक्षा वेगळी जाणवू शकते. अशी गाठ असताना कोणत्याही प्रकारची वेदना होईलच असं नाही. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं वेगवेगळी असू शकतात. काही महिलांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे या आजाराबाबत जागरूक राहणं आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळी तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
स्तनाच्या त्वचेत बदल होणं, त्वचा सुरकुतल्यासारखी दिसणं, लालसरपणा येणं, त्वचेचा थर निघणं किंवा एखादा भाग जाड होणं असे बदल दिसल्यास ते दुर्लक्षित करू नका. काही वेळा स्तनाची त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसू लागते. तसंच स्तनाचा नेहमीचा आकार किंवा रूप बदलल्याचं जाणवलं तरी डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे.
अशा प्रकारचे बदल दिसले म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरच आहे असं नाही. मात्र कोणतंही स्पष्ट कारण नसताना हे बदल होत असतील किंवा बराच काळ टिकून राहत असतील तर तपासणी करून घ्यावी.
निपल म्हणजे स्तनाग्र. त्याच्या नेहमीच्या स्थितीत अचानक बदल होणं, निपल आतल्या बाजूला वळणं किंवा त्यातून वेगळ्या प्रकारचा द्रव बाहेर येणं ही लक्षणंही लक्षात घ्यायला हवीत. निपलमधून रक्त किंवा पाण्यासारखा पारदर्शक द्रव बाहेर येत असेल आणि त्याचा स्तनपानाशी संबंध नसेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
अनेक महिला त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देत नाहीत. कामाच्या गडबडीत, संकोचामुळे किंवा आपोआप बरं होईल या विचाराने त्या डॉक्टरांकडे जाणं टाळतात. लाज किंवा कामाचा व्याप यामुळे तपासणी पुढे ढकलू नये.
ब्रेस्ट कॅन्सर झाला तर स्तनात वेदना झाल्याच पाहिजेत असा अनेकांचा समज असतो. पण हा समज चुकीचा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ब्रेस्ट कॅन्सरमध्ये कोणत्याही प्रकारच्या वेदना होतीलच असं नाही. वेदना सुरू होण्याची वाट पाहत बसल्यास डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होऊ शकतो. स्तनात सतत वेदना होत असतील किंवा नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचा त्रास जाणवत असेल तरी तपासणी करून घ्यावी. कारण स्तनात वेदना होण्यामागे कॅन्सरशिवाय इतर कारणंही असू शकतात.
प्रत्येक महिलेने आपल्या स्तनांचा नेहमीचा आकार आणि स्पर्श कसा असतो, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे शरीरात काही नवीन बदल झाल्यास ते लवकर लक्षात येऊ शकतात. कुटुंबात कोणाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे का, याची माहिती डॉक्टरांना द्यावी. तसंच वय लक्षात घेऊन डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या वेळेवर करून घ्याव्यात.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, स्तनांमध्ये होणारे बहुतांश बदल हे कॅन्सरमुळेच होतात असं नाही. मात्र एखादा नवीन किंवा वेगळा बदल जाणवल्यास तो आपोआप ठीक होईल, असा विचार करून दुर्लक्ष करू नये. कारण काही वेळा सुरुवातीच्या टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सरमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. अशा वेळी नियमित तपासणी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.