नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. अनेकजण नवीन वर्षाला व्यायाम करण्याचा किंवा फिटनेसशी संबंधित वेगवेगळे संकल्प करतात. पण काहींना कामाच्या वेळेनुसार ते फॉलो करायला जमत नाही. अशावेळेस लोक चालण्याचा मार्ग निवडतात. पण चालण्याने काहींच्या शरीरावर दुष्परिणाम होतो असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पुढे आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
रोज किमान १० हजार पावले चालून तुम्ही फीट राहू शकता. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर भावना हरचंद्राई यांच्या मते, रोज १० हजार पावलं चालण्याचा निर्णय काही वेळा शरीराचं नुकसान करू शकतो. आराम न करता किंवा व्यवस्थित संतुलन न राखता रोज खूप अंतर चालल्याने गुडघे, कंबरेवर ताण येऊ शकतो. सिमेंटच्या रस्त्यांवर किंवा चुकीचे शूज घालून चालल्यावर सुद्धा सांधेदुखी, पायांच्या तळव्याचा त्रास किंवा गुडघेदुखी वाढते.
तुमच्या शरीराच्या खालच्या भागावर चालल्याने परिणाम होत असतो. यामुळे वरच्या शरीराचा भाग आणि कोअर स्नायू दुर्लक्षित होतात. तुम्ही जर बरेच दिवस असं करत असाल तर शरीराचा पोस्चर बिघडण्याची शक्यता जास्त असते. रोज एकसारख्याच वेगाने चालल्यावर शरीराला त्याची सवय लागते आणि जास्त प्रमाणात वजन कमी होतं किंवा फिटनेस वाढणं थांबतं.
कामाच्या स्ट्रेसमुळे आधीच थकलेल्या लोकांसाठी १० हजार पावलं शक्य नसतं. गरज नसताना चालणं सुरू ठेवल्याने तुम्हाला थकवा, स्नायूंमध्ये वेदना आणि मानसिक कंटाळा येऊ शकतो. काही लोक फक्त चालणं पुरेसं आहे असं समजून स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्ट्रेचिंग किंवा इतर व्यायाम पूर्णपणे टाळतात, जे रोजसाठी योग्य नाहीत. तज्ज्ञांच्या मते, १० हजार पावलं हा नियम नसून एक मार्गदर्शक आकडा आहे. प्रत्येकाने आपल्या वय, कामाची पद्धत आणि शरीराची क्षमता पाहून व्यायाम ठरवायला हवा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.