आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं असावं, असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी आपण घराची नियमित साफसफाई करतो. परंतु घरातील काही जागांकडे आपलं सहज दुर्लक्ष होतं. त्यापैकी एक जागा म्हणजे दरवाजाच्या मागचा भाग. घरात आल्यावर अनेक जण कोट, बॅग किंवा टॉवेल दरवाजाच्या मागे असलेल्या कडीला अडकवतात. ही सवय अगदी सामान्य वाटत असली, तरी वास्तुशास्त्रानुसार त्याचा घरावर परिणाम होऊ शकतो, असं मानलं जातं.
वास्तुशास्त्रात दरवाजाला केवळ येण्या-जाण्याचा मार्ग मानलं जात नाही तर घरात ऊर्जा येण्याचं प्रवेशद्वारही मानलं जातं. त्यामुळे दरवाजाच्या मागे काही वस्तू ठेवल्याने घरात येणारी सकारात्मक ऊर्जा अडू शकते, अशी समजूत आहे. याचा घरातील सदस्यांची प्रगती, आरोग्य आणि घरातील वातावरणावर परिणाम होऊ शकतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे दरवाजाच्या मागे कोणत्या वस्तू ठेवणं टाळावं, हे जाणून घेऊया.
अनेक घरांमध्ये कपडे ठेवण्यासाठी जागा नसल्याने किंवा घाईमुळे दरवाजाच्या मागे कपडे टांगले जातात. हळूहळू या कपड्यांचा ढीग तयार होतो. वास्तुशास्त्रानुसार, अशा प्रकारे कपडे साठवून ठेवल्याने त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. यामुळे घरातील सदस्यांना मानसिक ताण जाणवू शकतो. तसेच चिडचिड होण्याची शक्यताही असते. त्यामुळे दरवाजाच्या मागे कपड्यांचा ढीग साठवण्याऐवजी ते व्यवस्थित जागेवर ठेवावेत.
काही जण औषधं वेळेवर घ्यायला विसरू नये म्हणून त्यांची पिशवी दरवाजाच्या मागे टांगून ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ही सवय योग्य मानली जात नाही. औषधं ही आजाराशी संबंधित असल्याने त्यांना आजाराचं प्रतीक मानलं जातं. दरवाजाच्या मागे औषधं टांगून ठेवल्याने घरात आजारपणाचा प्रभाव टिकून राहतो, अशी समजूत आहे. यामुळे उपचारांवरील खर्च वाढू शकतो आणि घरातील वातावरणही तणावपूर्ण होऊ शकतं, असं मानलं जातं.
वेळेनुसार पुढे जाणं हे जीवनात महत्त्वाचं असतं. मात्र, अनेक जण वर्ष संपल्यानंतरही जुनं कॅलेंडर घरातून काढत नाहीत. काही वेळा ही कॅलेंडर दरवाजाच्या मागे तशीच लटकत राहतात. वास्तुशास्त्रानुसार, दरवाजाच्या मागे अनेक वर्षांची जुनी कॅलेंडर ठेवणं योग्य मानलं जात नाही. यामुळे जीवनातील प्रगती थांबू शकते, अशी समजूत आहे. तसेच जुन्या आठवणींमध्ये अडकून राहिल्यामुळे नवीन संधींकडे दुर्लक्ष होऊ शकतं, असंही मानलं जातं. त्यामुळे वर्ष संपल्यानंतर जुनं कॅलेंडर काढून टाकावं.
घरात प्रवेश करताना अनेक जण चप्पल आणि बूट दरवाजाच्या बाजूला किंवा मागे काढून ठेवतात. मात्र, या ठिकाणी चप्पल-बुटांचा ढीग करणं टाळावं. ज्योतिषशास्त्रानुसार, चप्पल आणि बुटांचा संबंध राहूशी जोडला जातो. दरवाजाच्या मागे किंवा मुख्य दरवाजाजवळ चप्पल-बूट साठवून ठेवल्याने राहूचा नकारात्मक प्रभाव वाढू शकतो, असं मानलं जातं. यामुळे घरात विनाकारण वाद होणं आणि तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.
अंघोळ केल्यानंतर अनेक जण ओला टॉवेल वाळवण्यासाठी दरवाजाच्या मागे टांगतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ही सवय टाळावी, असं सांगितलं जातं. ओल्या वस्तूंचा संबंध राहू आणि नकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. दरवाजाच्या मागे ओलावा राहिल्याने घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते, अशी समजूत आहे. याशिवाय आरोग्यावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असं मानलं जातं. त्यामुळे ओला टॉवेल दरवाजाच्या मागे टांगण्याऐवजी योग्य ठिकाणी वाळत घालावा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.